गोयंची नवी सकाळ


पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या गोवा दौऱ्यावर आहेत. 28 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर पर्यंत असणारा हा दौरा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या खिजगणतीतही नाहीय. पण दिल्ली मात्र दिदींच्या या राजकारणाकडे फार लक्ष ठेवून आहे. अर्थात आज गोव्यात दिदींच्या राजकारणाची हवा जोरात निर्माण झाली असली तरी, मागच्या आठवड्यात दिल्लीत फक्त गोव्याच्या राजकारणासंदर्भात झालेली भाजपाची मोठी बैठक लक्षात घेतली तर भाजप आता सहजासहजी गोवा जावूच देणार नाही हे तेवढेच खरे आहे आणि त्याचवेळेला भाजपला विरोध म्हणजे मगो, गोवा फॉरवर्ड असे प्रादेशिक पक्ष आहेत तसे निवडणूक आली की उगवणारा, कदाचित त्याचवेळी जाता जाता चल र गड्या म्हणून फेरफटका मारणारा राष्ट्रवादी, भाजपला निवडणूक सोपी जावी म्हणून सहकलाकार असणारा आप, आणि हक्काचा मतदार असूनही गोंधळलेला काँग्रेस या सगळ्यांना लढत तृणमूलला गोव्यात आपले स्थान निर्माण करायचे आहे.



तृणमूलचा पश्चिम बंगाल वरुन थेट गोव्यात उडी मारण्याचा हा 'चेतक'प्रयोग खूप दृष्टीने अभ्यास करण्याजोगा आहे. मुळात एक टक्क्यांपेक्षा कमी असणारा बंगाली मतदार हा तृणमूलचा मतदार नाहीच आहे. तृणमूल भाजपविरोधात असलेल्या मूळच्या काँग्रेसच्या मतांना आपल्याकडे ओढायचे आहे. आणि गोव्यात फक्त भाजप आहे हे मुंबईत बसून कागदावर बदिसलेले प्रत्यक्षात समीकरण फार वेगळे बनले आहे. मागच्या निवडणूक निकालात भाजपची देशात सत्ता असताना पुन्हा पर्रीकर यांना गोव्याच्या राजकारणात सक्रिय व्हावे लागले होते आणि तरीही काँग्रेस संख्याबळाने जास्त होती.

निकालोत्तर घडामोडीत काँग्रेसच्या गोटात फोडाफोडी झाली आणि भाजप आज 27 अधिक हातचा एक असे करुन 28 बनलीय. 2019 नंतर भाजप गोव्यात आज सत्तेत असली तर भाजपचा चेहरा असणारे पर्रीकर आज नाहीत याचा भाजपला विसर पडलाय. मुळात देशात भाजपची लाट असतानाही काँग्रेसने गोव्यात मारलेली मुसंडी ही गोष्टच जास्त चिंतनीय होती. काँग्रेसच्या मतदारांना आज विरोधाचा पर्याय हवाय ही गोष्ट नेमकी तृणमूलने हेरलीय. मी परत सांगतो तृणमूल इथे tmc म्हणून नाही आलीय ती आम्ही काँग्रेस आहोत हेच सांगायला आलीय.


तृणमूल काँग्रेसचा हा दौरा अत्यंत सुनियोजित आहे. त्या दौऱ्यात मंगेशी शांतादुर्गा आहे, या देवी सर्वभूतेशू आहे, मच्छीमार वस्तीना भेट आहे, पत्रकार संवाद आहे, शेतकऱ्यांची भेट आहे.. मुळात आपण हरलो तरी चालेल पण तृणमूलला गोव्यात लढायचे आहे. गोव्याच्या राजकारणाचे एक वैशिष्ट्य नक्की आहे, निवडून आल्यावर कोण कुठल्या विचारधारेसोबत आहेत याचा ना पक्षांना फरक पडतो ना लोकांना.. तुम्ही काय हवं ते करा फक्त गोव्याच्या शांततेला तडा नाही लावू द्यायचा. आणि हीच गोष्ट विसरल्यामुळे तृणमूल मोठी व्हायची शक्यता नाकारता येत नाहीय.

ममता बॅनर्जी यांच्या बॅनरला काळे फासणे आणि जागोजागी अचानक जय श्रीराम चे बॅनर लागणे या गोष्टी राजकीय अस्वस्थता दाखवतायत.. मुळात मागच्या पाच वर्षात खूप साऱ्या अशा गोष्टी घडल्यायत की ज्या आता जाहीरनामा म्हणून समोर येतायत. आणि हीच अस्वस्थता घातक असते. तृणमूलला गोव्यात परपार्टी ठरवताना तृणमूलने मात्र भूमिपुत्र हा भावनिक विषय मोठा केलाय.
डेरेक ओ ब्रायन पासून सुरु झालेला गोव्याच्या लढाईचा प्रवास आता लिएण्डर पेस, नफिसा अली अशा ग्लॅमरस चेहऱ्यासोबत आता अनेक नवे कार्यकर्ते जोडत चाललाय. मुळात भाजप गोव्यात हरेल असे काहीच चिन्ह नसताना काँग्रेस जिंकेल हे नाकारणे जसे चूक आहे तसेच तृणमूल अगदीच रिकाम्या हातानी जाईल असेही वाटत नाही.
पण या सगळ्यात कमाल एकच वाटते, गोव्याच्या जवळ असणाऱ्या महाराष्ट्राच्या कुठल्याच नेत्यांचा जिथे प्रभाव पडत नाही तिथे ममता बॅनर्जी आज प्रभाव पाडतायत. उद्या कदाचित दिल्लीचे अरविंद केजरीवाल ही आपला करिष्मा दाखवतील..मग अशावेळी शिवसेना, राष्ट्रवादी गोव्यात पोहोचताना एवढी वर्ष का अडखळली याचे उत्तरे नेत्यांनीच आपापल्या पक्षाला द्यावी. पोहोचणं सोपे असतानाही पावले का वळली नाहीत यासाठी आता मुठी वळून काहीच उपयोग नाहीय.
उजाडणारा प्रत्येक दिवस दरदिवशी खूप छान करतो असे काही नाही. पण प्रत्येक पहाट एक स्वप्न देते. त्याच पहाट सकाळची स्वप्नाची ही गोष्ट सांगायला दीदी जमलीय. आता गरज आहे ती कुणाच्याही कोंब्यामुळे उजाडणाऱ्या खऱ्या दिवसाची !

Comments