भूमीरंग

"जो मालवणच्या स्टेजवर टिकलो त्येका जगाच्या खयच्याय स्टेजवर नेवन उभो करा.. खावन टाकतलो" 

बाबूजींचे हे वाक्य.. वस्त्रहरण मालवणात जेव्हा अवघ्या १६ प्रेक्षकांच्या उपस्थितीत सादर झाले होते ना तेव्हाच्या आठवणीतील.. हे वाक्य फक्त मालवण प्रेमातुन आलेलं कधीच नव्हते. ते वाक्य होते रसिक प्रेक्षकांनी कलाकार म्हणून स्वीकारताना त्याची पाहिलेली परीक्षा आणि त्या परीक्षेतून पास झालेली अनवट यशसिद्धी या एका गुणासाठी प्रचंड मोठं आहे. 
फक्त दोन उदाहरणं सांगतो.. वायरी भूतनाथ इथे भूतनाथ नाट्य मंडळ आहे. रंगभूमी दिन साजरा करताना वायरी भूतनाथचे प्रदीप वेंगुर्लेकर आणि त्यांची संस्था आजही जो नाट्यधर्म जागवतायत ना,  त्यातून एक फार मोठा नाट्यवसा जाणवतो. १९४५ साली स्थापन झालेली ही संस्था दरवर्षी बरोबर सात वाजता नटराजाची पूजा करते. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजतागायत एक संस्था टिकून राहते आणि दरवर्षी नाटक सादर करते याला फक्त रंगभूमीची सेवा म्हणतात. 

दुसरे एक उदाहरण देतो, गवंडीवाड्याच्या राम मंदिरांच्या रंगमंचाचे ! नाटक म्हणजे फक्त रंगमंच हे समीकरण असेल तर शहरात गंवडीवाड्याच्या मेळ्यात फिरणारे 'श्रीमंत' कलाकार पाहिले की तुमचा स्वताचा कलाकार म्हणून चुकून आलेला अहंम असेल ना तो तुमच्याच पायदळी तुडवला जाईल. गावागावात सपत्याला आता मुलं नसतात रे असे म्हणताना जो आर्त भाव नसतो ना तो शहरात मात्र मेळ्यापासून नाटकापर्यंत दरवर्षी चढ्या क्रमाने वाढत जातो. यंदा कोरानामुळे नाटक करता आलं नाही ही तळमळ जाता जात नाही या मुलांच्या चेहऱ्यावरुन ! मला वाटतं 'नाटक' नावाची गोष्ट समजून घेताना या दोन गोष्टी तुमच्या सिलेबसला असल्याच पाहिजेत. शाळा आणि मंदिरे यांच्या मालकीची स्वताची स्टेज असणे ही श्रीमंती मुळात कोकणातच बघायला मिळते..आपण फक्त त्या समृद्ध परंपरेचे पाईक आहोत हे कायम जपलं पाहिजे !

मराठीतल्या बहुतांश नाट्यभिनेत्यांच्या आत्मचरित्रात मालवणच्या रंगमचाचा उल्लेख आवर्जून आलाय. आमचे जयंतराव साळगावकर नेहमी एक आठवण सांगायचे, की मेढ्यातला मारुती मंदिरात राजापूरहून आयुष्याची वाट शोधायला आलेला एक तरुण एक रात्र थांबतो काय.. आणि त्याच रात्री मारुतराया नारळ देऊन जा रंगभूमी तुझी वाट बघतेय असा दृष्टांत देते काय.. आणि तोच तरुण पुढे नटसम्राट गणपतराव जोशी म्हणून जगदमान्य होतो. मालवण नाटक नावाची गोष्ट हातात देते, आणि हातात नारळ देणारा मारुतराया स्वतः असतो या सगळ्यालाच रंगावकाश म्हटल तरी त्यात गैर काय आहे ?

मालवणचा प्रेक्षक आवडलं तर आवडलं, आणि  नाही आवडल तर तोंडावर सांगणार नाही आवडलं नाटक.  ही जी खासियत आहे ना ता ती कलाकार म्हणून तुमचे 100 टक्के परफॉर्मन्स द्यायला भाग पाडते. 

रंगमंच नावाची गोष्ट एवढी वैविध्य म्हणून जगलोय की त्याची मजा स्टुडिओत पण नसते म्हणा ! पोफळी आणि फळीचे केलेलं स्टेज, ४० बेरेल उभे करून केलेलं स्टेज, शाळेची टेबल मांडून केलेलं स्टेज, बेंच मांडून केलेलं स्टेज, कॉलेजच्या लेव्हल वापरून केलेलं स्टेज, या सगळ्या प्रकारात गरिबीमे अमिरीका अंदाज होता..
झापाच्या जिजाई पासून सुरू झालेला प्रवास आज मामा वरेरकर नाट्यगृहापर्यंत येऊन थांबलाय. पण प्रेक्षक तसाच आहे, पुण्यामुंबईत नाटक गाजतय म्हणून उगाच तोंडदेखल कौतुक असे नसतेच मुळी.. चांगलं असेल तरच कौतुक ! 

सोबतच्या फोटोत दिसतोय ना माझ्या स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा रंगमंच.. महाराष्ट्रात एखाद्या कॉलेजचा असा कुठलाच रंगमंच नसेल की ज्याच्यावर एका शैक्षणिक वर्षात सलग तीन दिवस सहा दिवस स्नेहसंमेलन सादर व्हायचं. रात्री नऊ ते रात्री दोन अडीजपर्यंत सुरू असलेला रंगसोहळा ! २५ एकांकिका आणि एक तीन अंकी नाटक. ज्याला पुण्यामुंबईत आज नाट्यजागरबिगर म्हणतात ते आमच्या मालवणात तीस वर्षांपूर्वी व्हायचे. वारसा वारसा म्हणजे आणि काय हवं असते ओ ? 

मालवण कॉलेजचं स्टेज म्हणजे फार पॉश रंगमंच असा काय प्रकार नसेल, पण त्याच्यावर मिळालेला कॉन्फिडन्स हा 'कमाल'च असतो.. आज तुमचा व्हिडिओ १.३ मिलीयन क्रॉस करतो तेव्हा त्याचे अप्रूप अजिबात नसते, कारण तुम्ही या स्टेजचे फाईंड आहात ना.. मग दुनियेचा विषय क्लोज ! 

प्रत्येकाच्या आयुष्यात तुम्ही आज कलाकार नसाल कदाचित,  पण पुन्हा शाळेचा आणि कॉलेजचा रंगमंच जो बाऊन्सबॅक करत दर दिवशी आठवत राहते.  त्याच्यातच जगण्याचे 'नाटक' दडलेय ! तुमचा पहिला परफॉर्मन्स हाच तुमच्यासाठी फार मोठी श्रीमंती आहे. नाटक करायला रंगमंचच हवा अशी गरज कधीच नसते फक्त आपल्याला परफॉर्म करायचंय हे डोक्यात ठाम हवं! आणि एकदा ते कळलं की तुम्ही आयुष्यभर नाटककार म्हणून जगत राहता !

प्रत्येकाच्या वाट्याचे असलेले आणि ज्याने त्याने स्वतःच्या मुखवट्याआड दडवलेले 'नाटक' तुम्हा प्रत्येकाचे आयुष्य औक्षवंत करो याच रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा !!

ऋषी श्रीकांत देसाई
आदित्य थिएटर्स , मालवण

Comments