अंतरी दिगंतरी


आज देवप्रबोधनी एकादशी. वैकुंठाला भूलोकचा मोह व्हावा आणि इहलोकांचे वैकुंठ व्हावे ऐसी पुण्यप्रद तिथी.. पण विस्मयाचा थरकाप व्हावा ऐसे घटित का घडावे ? नियतीने रेखलेल्या प्राक्तन म्हणून का इतुकेच थांबावे ? ज्याला पिंगळावेळ समजून गाढ झोपून जावे त्याच  बेसावध क्षणी काळाने एवढी कातरवेळ बनून घात करावा ? ऐन एकादशीच्या सकल संतजनांच्या मेळ्यापूर्वी  अवचित मनपाखरू एवढं का उडून जावं ?  भल्या पहाटे बाराही आमावस्येनचा एवढा काळोख का दाटावा ? सवाल कोणास पुसावा आणि जबाब तरी कुणाकडे मागावा. स्तब्ध झालेल्या तुमच्या बा सह्याद्रीकडे की माय भीमा कृष्णा कावेरीकडे ? बोला श्रीमंत बोला ?

श्रीमंत.. बळवंत मोरेश्वर पुरंदरे ! राजा शिवछत्रपती इतुका अष्टक्षरी शब्द संजीवन घेऊन दिवटी घेऊन तो सगळा बेलभंडार उधळत गेलात. बाबासाहेब पुरंदरे हे फक्त नाव नव्हतेच तो इतिहास होता, अखंड वर्तमान होता.. वाटेवर भेटलेल्या प्रत्येक माणसाच्या मस्तकी लागलेला भंडारा आणि जन्म भराचे पेटत राहणारा दिवटीचा उजेड होता. आमुच्यासाठी त्या उजेडाच्या काजळीची दृष्ट ही कौतुकाची होती अमाप होती.. ती रंध्रात रक्त बनायची, मस्तकात स्मरण बनायची, डोळ्यात इतिहास बनायची आणि वाणीतून उच्चारताना 'महाराज' हा आभाळघोष बनायची.. जिवंत देहाला इतिहासाची पताका बनवणाऱ्या या माणसाने निघताना न सांगता निरोप घ्यावा ? 

शाहीर, तुमच्याशी तक्रारही मांडली असती पण इथल्या मातीतल्या ढेकळाशी उभ्या जन्माचे वैर घेऊन जगावे लागेल. जाणे अटळ आहे मान्य आहे. पण मनामनात मशाली पेटवणाऱ्या या माणसाने पण समईतल्या त्या विझलेल्या वातीची चरचर कशी थांबवायची याची उकल केलीच नाही. इतिहास बखरीत, नोंदीत , पुस्तकात असतो पण मस्तकात काळजात कोरणारे शाहीर फक्त तुम्हीच आहात!

शाहीर तुमच्या आयुष्यापासुन किंती ते शिकावे ? वाचावे बोलावे आचरावे सगळं कबूल, पण स्मरावे ते केवळ शिवराय ! निमिष, घटिका आणि सेकंद या सगळ्यातला काटेकोरपणा लक्षात राहू दे. गडकोटातल्या दगडावर प्रेम करायला तुम्ही शिकवले. शतकापार जगून युगानयुगाचा दिमाख इतिहास आमुच्या आयुष्यात दिधला ! श्रीमंत कसली तक्रार असणार हो आमच्या काजळभर पसरलेल्या दिवटीची.. फक्त अंधारात पाऊल टाकताना पावलात बळ द्या, घोष करताना स्वरयंत्रात या, आणि हरलोय असे वाटताना कानात 'छत्रपती शिवाजी महाराज' फक्त एवढे उच्चारा ! 

आता उगवतीच्या मावळतीला एवढेच साकडे, मनात पेरलेला शिवसूर्य असाच स्मरत राहो आणि महाराज नावाची तशी ललकारी फुटत राहो, अंतरी दिगंतरी !!

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

- ऋषी श्रीकांत देसाई
देवप्रबोधनी एकादशी

Comments

  1. बाबासाहेबांना याहून चपखल शब्दांत श्रध्दांजली नाही...🙏🙏

    ReplyDelete
  2. अफाट .. शिवशाहीरांना साजेशी श्रद्धांजली..
    आशिष पेडणेकर ..

    ReplyDelete
  3. 👌👌भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

    ReplyDelete

Post a Comment