मुक्काम 'पोष्ट' प्रेमगल्ली


आज १४ फेब्रुवारी.. देशभर प्रेमाचा रंग चढलाय. कोरोनाचा काटा आहे पण जमेल तसे, आणि जमवता येईल तसा गुलाबी रंग आज गडद होत चाललाय. प्रेम सेलिब्रेट करायच्या सगळ्या जागा पाहताना माझ्या काही गावच्या जागा मात्र हटकून आठवतायत. मुळात या जागा आणि आठवणी या सगळ्या 80 ते 90 दशकातील आहेत.. त्यामुळे त्या जागा आणि त्यातील संवाद साधण्यासाठी केलेली धडपड ही गंमतशीरपणे मांडण्याचा केलेला हा प्रामाणिकपणे प्रयत्न आहे.  मुळात शहरीकरणाच्या रेट्यात त्या आठवणी आज चिरडल्या जातायत यासाठी म्हटलं थोडं लिहुया !!

मालवणातील प्रेम या शब्दाला समांतर शब्द कुठला असेल तर प्रेमगल्ली..या शब्दाची दाहकता कळायची असेल तर बरोबर काळाच्या तेवढंच मागेही गेलं पाहिजे म्हणा.. विशेषतः आजचे मालवण जे पाहतायत किंवा ज्यानी 2000 नंतरचे मालवण पाहिलंय त्यांच्यासाठी हे सगळं नवीन असेल म्हणा.. कारण ती गोष्ट आता खूप ब्रॉड झालीय.

प्रेमगल्ली ही मालवण मधील एक गल्ली होती. तेव्हा फारशी गजबज नसली तरी शांत जागाही नव्हत्याच म्हणा. कनेक्टिव्हिटी म्हणजे सायकल आणि तारुण्यातले यंत्र म्हणजे टाइप रायटर अशा जगण्याचा तो काळ होता.. त्याच काळातली ही प्रेमगल्ली..   दोघांनी दोघांना गाठायची खैबर खिंड, आणि तिसरा आला तर प्रत्येकाने देहाला जावळखोऱ्यात लोटून फरार होणं अशा कल्पनेतील ती प्रेमगल्ली होती.

सगळ्या खेळातला कॉलेजात जायच्या वयात बदाम पान आणि त्यातला बाण ज्यांना ज्यांना ओढत न्यायचा ना त्या प्रत्येकाला त्या प्रेमगल्ली नावाच्या तीनशे मीटरचा नव्या जगण्याची वाटेवर रेंगाळत उभं करायचा. सरस्वती चित्रमंदिरच्या बॉक्समध्ये बसण्या अगोदर ती उभं राहण्याची जागा होती म्हणा. आणि आज लिहिताना हसू येतय एवढ्या अफवा त्या जागेबद्दल पसरवून ठेवल्या होत्या.. बरं ती वाट जिथे सुरु व्हायची तिथं आणि संपायची तिथं दोन मोठी चिंचेची झाडं होती.. चिंचेची झाड या आपल्या पूर्ण आयुष्यात जेवढ्या चिंचा जन्माला घालत नाही तेवढ्या गाभुळलेल्या अफवा जन्माला घालते.. मुळात त्या वाटेवर कोणी जाऊ नये म्हणून या चिंचाना पहारेदार बनवताना सोयीने प्रत्येकाने अफवा आणि भीतीची हाळी द्यायचे काम केले होते..

आता त्या प्रेमगल्लीत काय व्हायचे हे इथे एक्स्प्लेन नाही करू शकत, पण शहरातला हमरस्ता म्हणजे जर व्हाट्स अप असला ना तर, प्रेमगल्ली इन्स्टाग्रामचा मेसेंजर होता. जिथे फार कोणी जात नाही, आणि जे इथे जातात मेन रस्त्यावर नाही रेंगाळत ! एक चिंचोळी पाणंद, जेमतेम दोन सायकल जातील एवढा रस्ता होता. आणि प्रेमगल्लीत सायकल दामटवत नेणे हे स्किल असायचे. कारण वाटेवर मधल्या जागी असलेली रेतीची पुळण तुमचा सगळा माज उतरावयची.. 

अर्थात हे सगळं आमच्या शाळकरी वयात आम्ही कॉलेजला गेलो आणि त्याचे रूप बदलले . पूर्वी ज्या वाटेवर लोक प्रेमात पडायचे ना, आम्ही मोठे झालो आणि त्या वाटेवर गटारात पडण्याचा धोका निर्माण व्हावा असे साईट गटार आणि त्याला कट टू कट वळण मारून घेतले.. बर प्रेमगल्लीच्या या तोंडावर समीर शेखची आई आणि त्या साईडला बांगी मामाची घरा.. कोण रे जायत त्या वाटेक म्हणा ?

प्रेमगल्ली आता खूप बदललीय, ती जिवंत होती ना तेव्हा तिच्या वाटेला ते व्हॅलेंटाईन डे कल्चर नव्हते.. पण ज्या काळात 'कल कॉलेज बंद हो जायेगा, फिर एक लडका एक लडकी को मिल नही पायेगा' कल्चर होते..  याच गल्लीत अनेकांची नव्या जगण्याची स्वप्न फुलली, संसारही उभे झाले.. काहीजण इथेच शेवटचे भेटले.. त्यांनतर गल्लीच्या वाटा दोन बाजूला निघाल्या तशा जगण्याची वाटाही निघाल्या असतील.. पण एक नक्की की ही गल्ली प्रत्येकाला मनातली गोष्ट मनापर्यंत पोहोचवायची स्पेस द्यायची.. आज ज्या काळात सगळे जवळ आहेत पण तरीही मनाचा कोंडमारा होतो ना त्या काळात तो प्रेमगल्लीचा एक चिंचोळा रस्ता आठवला की पॉल ब्रूटन सारखा सगळं विलक्षण वाटू लागतो.. आमच्या अगोदरच्या पिढीचे सुरस किस्से जिवंत होतात..

प्रेमगल्ली कधीच कुणाजवळ बोलली नाही, की कुजबुजली नाही.. की तिने त्या सत्तर- ऐंशी आणि नव्वदच्या दशकात उभे राहायचेही चार्ज मागितले नाही.. एक मात्र नक्की आज ओयो वाल्या प्रेमाच्या काळात प्रेमगल्ली संध्याकाळी सात नंतर इथे कुणालाच थांबू द्यायची नाही. फ्लर्ट हा प्रकार जन्माला यायच्या अगोदरच्या काळात चॅट पण नव्हते ओ, एक वहीच्या कागदावर लिहिलेला टेक्स्ट मेसेज सेंड करायची ही जागा.. फरक इतकाच होता की हा त्या राऊटरचा झोन होता की ज्याचा पासवर्ड फक्त त्या दोघांनाच ठाऊक होता..

पुलंच्या त्या बटाट्याच्या चाळीतल्या शेवटच्या प्रकरणासारखा जेव्हा आज प्रेमगल्लीकडे पाहतो तेव्हा त्यात आता पाहण्यासारखे काहीच उरलं नाहीय हे जाणवते.. मुळात आज ब्रेकअप झाल्यावर दोन वाटा तरी कशाला हव्यात या पिढीला आज गल्ली समजावून सांगणे कठीण आहे.. ही जी गल्ली आहे ना ती स्वतःच्या वाटेच्या तोंडावर येऊन स्वतःच उभी राहते आणि रो रो पळणाऱ्या केटीएम , ऍक्टिव्हा पाहतेय.. कधीकाळी गल्लीत उभं राहून लव्ह यु गो म्हणणाऱ्या पिढीच्या नातवंडाना पाहत डोळ्यातून झरणाऱ्या पाण्याला काय म्हणावं यांच्या विचारांत असेल म्हणा.. 

कधी गेलाच तर त्या वाटेला, तर त्या गल्लीला फक्त निरोप द्या.. आता समजून जा तू खूप म्हातारी झालीस ग.. कॉलेजच्या लायब्ररीत आणलेले आणि सायकलच्या हँडलच्या केरीयरमध्ये अडकवलेले ययाती वाचलं असतस तर तुही कायम चिरतारुण्य जगली असतीस.. ते ही सोड.. पण तुझ्या वाटेवर जेव्हा काँक्रीट पडत होते ना तेव्हा तुझ्या वाटेवरची वाळू तरी जपून ठेवली असती ना तरी आज वेगाने धावणारा काळ कदाचित वाळूच्या घड्याळातल्या तुझ्या त्या सायकल अडवणाऱ्या वाळूमुळे धावला नसता.. चालत चालत निघाला असता..

जप स्वतःला... एक दिवस टाऊन प्लानिग मध्ये तू मरणार आहेस, तो पर्यंत स्वतःवर प्रेम कर !

आणि हो लव्ह यु प्रेमगल्ली

Comments

  1. प्रेम गल्ली तील जीवंतपना छान .....

    ReplyDelete

Post a Comment