|| तीर्थासी तुळणा नाही, आनंदवनभुवनी ||

स्वर्गीची लोटली जेथे
रामगंगा महानदी
तीर्थासी तुळणा नाही, 
आनंदवनभुवनी

समर्थ रामदास स्वामींच्या शब्दातील आनंदवनभुवनी हे शब्द जेव्हा लतादिदींच्या सुरातून कानी बरसतात तेव्हा रोमारोमात ते भिनत जातात. सुखाच्या परमोच्च क्षणी शब्दांना वाचा नसणे आणि डबडबलेले डोळे बरंच काही बोलून जातात. हा जो वपुर्झक्षण असतो त्या सुखाच्या वाटेवरचा एक अनुभव या क्षणाला महाराष्ट्राची कोकणपट्टी अनुभवतेय. एका जत्रेच्या निमित्ताने देव धर्म श्रद्धा संस्कृती या सगळ्या गोष्टी आता डोळ्यात प्राण आणून त्या एका क्षणाची वाट पाहतायत.

सतत धावत्या आयुष्याला एक खंडित काळाची विश्रांती मिळाली आणि अदृश्य असणाऱ्या काळनारदाने प्रश्न विचारला की तू हे सगळं कोणासाठी करतोय, का धावतोय. मनाला निष्ठुर बनवणाऱ्या त्या प्रत्येक वाल्याने न मिळणाऱ्या उत्तरासोबत स्वतःला शोधायला सुरुवात केली आणि मनाच्या गाभाऱ्यातला लपून बसलेला देव त्याला उलगडू लागलाय. आज आंगणेवाडी जत्रेच्या निमित्ताने देव नावाची गोष्ट कळसात नसते ती गाभाऱ्यात असते याचा प्रत्येकाला झालेला साक्षात्कार कुठलेही बोजड धर्मग्रंथ न वाचता एका सश्रद्धपणाच्या जाणिवेचा अनवट प्रवास आहे.

एक तप म्हणजे बारा वर्षे म्हणतात. बारा वर्षाचा अखंड काळ लोटल्या नंतरच्या जगण्याला मग तपनिर्मोह म्हणून स्वीकारताना मागच्या एक वर्षी जत्रेला जाता आलं नाही म्हणून काळजाचा झालेला दगड आठवताना प्रत्येकाला यंदा जत्रेकडे ओढतोय. जिथे माणसाचा राबता भूइवरच्या प्रत्येक जागेला व्यापून टाकतो तिथे कुणीही माणूस नसणे ही कल्पना जिथे करवत नाही तिथे ते रिकामे मळे, रिकामा गाभारा, रिकामे रस्ते पाहणे म्हणजे किती वेदनादायी असू शकते याचा अनुभव मागच्या वर्षी आयुष्यात एकदा तरी जत्रेला गेलेल्या माणसाने ते उणेपणे पाहताना नक्की घेतला असेल.

यंदा पुन्हा आंगणेवाडीची जत्रा भरतेय. मर्यादा फक्त भौतिक असतात आणि अथांगता ही माणूसपणाच्या श्रद्धेत खोल खोल असते.. यंदा जत्रा स्मरताना मागच्या वर्षीचे रितेपण आठवलं तरच यंदाच्या जत्रेच्या वाटेवर निघताना प्रत्येक क्षणी डोळे भरून येतील. मागच्या वर्षी याच आंगणेवाडी जत्रेवर लिहिताना जत्रा भाविकांसाठी खंडीत झाली हे स्वीकारताना  'हारी पडलो आता संकट निवारी' लिहिताना जी तळमळ होती , त्याच तलमळीला आता श्रद्धा गोष्ट पुरती उमगून चुकलीय. किंबहुना माझ्यासह अनेकांना जत्रेसाठी केवळ रस्त्यावर रेंगाळण्यापेक्षा लोक तासन तास जत्रेत दर्शनरांगेत का उभी राहतात या प्रश्नाचे उत्तर देणारी ठरतील.

आंगणेवाडीच्या जत्रेचा लेख लिहिताना शब्द ना नेहमी त्या धामापूरच्या तळ्यातल्या परडीसारखे भरभरून येतात. फुल सोडावीत आणि फक्त सोने यावं. इतरांना कितीही वाटा , आपली ओंजळ नेहमी भरुन उरतेच. यंदाही ओंजळ तीच आहे फक्त आता देवीकडे मागायला मला कुठल्याही गाऱ्हाण्याची गरज नाही, डोळ्यांच्या ओंजळी झाल्या आहेत. ती आंगणेवाडीची देवी अखंड त्रैलोक्य सत्ताधीश आहे.. पण 'आई' म्हणून तिचे आणि फक्त तुमचे नाते आहे.. आई आणि मुलाच्या नात्यात मध्यस्थ कोणी असू शकतच नाही.. एक वर्ष जत्रेला न जाणे हे भाविक म्हणून समजू शकतो. पण एक वर्ष आईला न भेटणे हे रितेपण मागची दोन वर्षे लाखो काळजाच्या उरात होते त्या प्रश्नांचे  एक पूर्णत्व यंदा जत्रेत मिळेल.

ही जत्रा ना लोकांची नसतेच मुळी.. आंगणेवाडीची जत्रा ही माणसाची असते. आपल्या माणसांनी आपल्या माणसाला भेटायची ती एक तिथी असते. एकाच आईच्या लेकरांचा तो कौटुंबिक सोहळा असतो. ज्यांना ज्यांना आंगणेवाडी शब्द ठाऊक असतो त्या प्रत्येकाला या जत्रेला आज इथे प्रत्यक्ष यायचे असते. पंढरीच्या कळसाला पाहून जे सुख मिळते तेच सुख इथं कळस दर्शनाला पाहून मिळते. मंदिर, भक्ती, नियोजन, राजकीय नेते, पोलीस, प्रशासन , एसटी महामंडळ आणि बाजाररहाट यांचा हा सरळरेखीय आलेख असतो. आणि त्याच आलेखावर लाखो बिंदू 'भक्त' म्हणून स्वतःला ओवतात ना त्या उत्कर्षरेखेला खऱ्या अर्थाने जत्रा म्हणतात.

जत्रेला नेहमी हौशे, नवशे आणि गवशे याच तीन प्रकारात पाहतात. लहानपण हा हौशेपणातला होता, लग्न नोकरी स्वीकारल्यावर ते नवशेपण ही आले. आणि मागची दोन वर्षे मला गवशेपणात ते नव्याने मिळतेय. किंबहुना गवसेपण म्हणजे काय हा आयुष्यातून हरवलेला शब्द यंदा कोणीतरी माझ्या ओंजळीत लाने आणि फुलासह भरून ठेवलाय. जत्रेत जाऊन शोधणाऱ्याच्या गवशेपणाच्या यादीत आता आपण सगळे सरकतोय. आपण आपल्याला आता शोधत चाललोय, एकलकोंडे पणातून आता समूह आपल्या जगण्यात का हवा या वाटेवरची ही जत्रा आहे. गाभाऱ्यात असलेल्या शक्तीपुढे नतमस्तक होताना ती ऊर्जा आतून भरून येणे या वाटेवरची ही यंदा भक्तीगाथा आहे.

यंदाही निर्बंध आहेत, अनेकासाठी यंदाही जाणे दुरापास्त आहे. त्या प्रत्येकाला प्रत्येकाने जत्रेपर्यंत नेणे अवघड असेल कदाचित पण आपापल्यापरीने एक मोठी ओटी आपल्या वाट्याला आली आहे. यंदा जत्रेला जाणाऱ्या माणसांनी जत्रेला न आलेल्या माणसापर्यंत ही जत्रा न्यायला हवी. प्रत्यक्ष जत्रेला आलो नाही तर आईच्या आणि तिच्या लेकरामधील ही भेट प्रत्येकाने आपल्यापरीने शोधली तरी जत्रा यंदा कोट्यवधी माणसाची होईल. याच जत्रेत मिळणाऱ्या शिताच्या प्रसादाचा जो संदेश आहे त्याचा खरा अर्थ यंदा शोधायची गरज निर्माण झालीय. जर प्रसादाला मिळणारी चार शिते आपण दुसऱ्यासाठी प्रयत्नपूर्वक आणून देत असू तर मग ओंजळभर आनंद नाही का देऊ शकत ?

यंदा गाभाऱ्यात जाऊन मागण्यापेक्षा मला वाटते, एका वर्षानंतर भरलेली ही जत्रा आपण मिटल्या डोळ्यानी समजून घेऊया. काळजात रुजवूया आणि हा अखंड माणूसमेळा पुन्हा नव्याने जागवूया. जत्रा काय असते हे शोधणे अवघड आहे, पण एक नक्की की यंदा जत्रा म्हणजे आनंदवनभुवनी आहे. लेकरांनी आपल्या आईला भेटण्याचा आणि माणसांनी पुन्हा माणसाच्या गर्दीत हरवून स्वतःला श्रीमंत करण्याचा हा योग पुन्हा जुळून आलाय. एक वर्षांनंतर आला असेल तरी याला मी तपच म्हणेल. जगण्याचे आणि आज असण्याचे सुख हीच खरी श्रीमंती आहे आणि ती केवळ आईमुळें मिळालीय ही एक गोष्ट समजली तरी जत्रा आणि जत्रेतले नियम हे प्रत्येकाचे प्रशासनापेक्षाही स्वतःचे स्वतःवर अधिक काटेकोर असतील. आणि मग कदाचित जत्रा म्हणजे काय मी सांगण्याची गरज उरणारच नाही म्हणा ! हा सगळा लेख संपवताना पुन्हा एकदा समर्थाच्या ओळी आठवतायत..

येथूनी वाचती सर्वे
ते ते सर्वत्र देखती
सामर्थ्य काय बोलावे, 
आनंदवनभुवनी

ऋषी श्रीकांत देसाई, वृत्तनिवेदक
लोकशाही न्यूज

Comments

  1. तुझ्या या लेखाने जत्रेला न येणाऱ्यांन पर्यंत यावर्षीची जत्रा नक्कीच पोचेल. ज्यांनी 2 वर्ष विरह सोसला आणि यावर्षी जत्रेला पोचणार नाहीत त्यांना तर बोचेल. 👌👌👌👌

    ReplyDelete

Post a Comment