'शिवस्य हृदयस्थ विष्णू, विष्णूस्य हृदस्थ शिव'


सिंधुदुर्गच्या मातीत एक दैवी अधिष्ठान आहे. अगदीच वारकरी संप्रदाय नसला तर सणासुदिच्या निमित्ताने वर्षानुवर्षे जपलेले जे गावभोळेपण आहे त्यांनी इथला मातीच्या कणाला देवस्वरूप मोठे केलंय. माझा या विषयात तेवढासा गहन अभ्यास नाही आणि मी स्वतहुन त्याच्या दूर राहतो. या मातीतली सगळी दैवत अभ्यासताना त्याच्या रुजीवपणात त्याचे ठामपण दिसते आणि अचलपणा एका गाव मर्यादेला वसवताना तो किती व्यापक बनतो हे वारंवार जाणवते. आणि त्याचवेळी चल स्वरूपात दैवत मांडताना खांबकाठी आणि अवसार यांचा विज्ञान म्हणून करायला शिकवणारे कुठलेही देवशास्त्र का ना नाही हा प्रश्न पिढ्यानपिढ्या विरळ होत चाललेला प्रश्न खूप मोठा होत जातो.



मुळात आम्ही रवळनाथ, सातेरी अशा संप्रदायात वाढलेली माणसे.. गणपती आणि गाव वार्षिकात आपले भक्तीपण जपतो. आणि या सगळ्यात देवळात जाऊन मिटल्या डोळ्यांनी तसेच भारवल्यापणात बाहेर येतो आणि मग देव मनोभावे पाहायचा राहून जातो. आणि मग आताच्या परिस्थितीत देऊळ बंद झाल्यावर नेमका आपला देव कसा दिसतो याची जी तगमग आहे ना त्यातला हा प्रश्न आहे.. देव तिथंच असतो रुजीव किंवा सजीव बनून आणि आपण मात्र पाषाण बनून जातो. यासाठी गाव आणि देव समजून घेणं ही काळाने आपल्यावर सोपवलेली एक मोठी जबाबदारी आहे..


मला नेहमी विचारतात की पुरा सिंधुदुर्ग पहायला किती दिवस लागतील ? मी फक्त एवढंच सांगतो, माझ्याकडे याचे उत्तर नाहीय.. कारण मीच स्वतः फिरलेलो नाहीय..आणि जे पाहिलंय ते अजून पाहण्याची ओढ कुठे संपलीय म्हणा ? या सगळ्या परिघात काही देवस्थान आपल्या पाहण्यात राहून जातात. किंवा पाहूनही पुन्हा पुन्हा पाहावीशी वाटतात. त्यातले एक देवस्थान म्हणजे नेरूरचे कलेश्वर मंदिर !


मुळात रंगभूमी याचा विचार स्टेज सोडून व्यापक करायचा कधी ठरवला ना तर कधीतरी नेरूर समजून घ्या.. तब्बल 32 वाडीची गावमर्याद आणि त्यांचा अधिपती असणारा श्री देव कलेश्वर ही प्रभावळच विलक्षण आहे. अगदी नेमकं आठवत नाही पण तैत्तिरीय संहितेत एक ओळ आहे,  ‘रुद्रो वा एष अग्नी: तस्यै ते तनुवौ घोराSन्या शिवाSन्या’..  म्हणजे रुद्र खरोखरीच अग्नी असून त्याची दोन स्वरूपे आहेत. एक, घोर म्हणजे भयंकर व दुसरे, शिव म्हणजे सौम्य, कल्याणकारक. अग्नी किंवा सूर्य हे रुद्राचे रूप आणि शांत तेज असलेला चंद्र हे शिवाचे रूप, असे वेदाने प्रतिपादिले आहे. कलेश्वराच्या माथ्यावर असणारा चंद्र आणि या संपूर्ण नेरूर परिसराचे असलेले जे एक अनामिक शांतपण आहे ना ते या चंद्रतत्वात आहे असे म्हटलं तरी ते वावगे नाही ठरणार..


नेरूरपारच्या त्या तळ्यात फुललेली कमळ पाहताना प्रसन्न वाटते पण त्याच्या उलट पाणी सुकल्यावर मनात तळ्याचा प्रत्यक्षात असलेला तळ आणि आपण कमळ पाहताना त्याच्या देठाची मुळापर्यत जाणारी व्याप्ती किती खोल असेल याचा विचार केलाय का कधी.. मला वाटत ते जे रखरखीतपण आणि त्यातून स्वतःला ठाम रोवण्याचा जो सिद्धांत आहे ना मला वाटते ते खरे शिवतत्त्व आहे.. भरून पावणे आणि उरून पावणे हे समजायला पाहिजे. निसर्गाच्या या महेश रुपात काहीतरी विलयाचा उदय असेल ना.. ते तळ तिथंच का या शोधात निघालात की मानसरोवरात दिसणाऱ्या कैलासाच्या बिंबाची आणि नेरूरच्या तळ्यात दिसणाऱ्या त्या मंदिराच्या प्रतिबिंबाची गोष्ट अधोरेखित होईल.. शिव हे अग्नी तत्वज्ञान आहे ते समजण्यास जो अघोरपणा लागतो तो नाहीय आपल्याकडे, पण जो चंद्र तत्व आहे त्याची संजीवन अवस्था तरी कुठाय आपल्याकडे ?


एक साधी गोष्ट सांगतो, आज महाशिवरात्रीला शिवाची अनेक ठिकाणी पंचमुखी पूजा बांधतात. पण मग पंचमुख म्हणजे नेमकं काय? सद्योजात, वामदेव, अघोर, तत्पुरुष आणि ईशान या अगम्यपणाची ग्राम संस्कृतीने जपलेली आराध्य भावना. तो कैलासावरचा शंभूनाथ समजायला सोपा आहे. त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. पण या लाल मातीतला काळोबास्वामी ओळखायला अगम्य आहे. कसलाही आकांडतांडव नाही की कसला गोंधळ नाही. त्याला सनइनौबत चालते, दशावतार चालतो, देवळाच्या बाहेर एक अगरबत्ती लावली तरी चालते किंवा नुसता हॉर्न वाजवून मान वाकवली तरी त्याच्या आणि भक्तांच्या थेट नात्यात कसलंच दुरावलेपण नसते.. त्याने भाळी चंद्र लेवून या मातीत जो सुशेगादपणा दिलाय ना तोच आमची जगण्याची श्रीमंती दिमाख बस्स !


मी मंदिराबद्दल लिहिताना ही आख्यायिका, हे खांब, हा नवस असलं कधीही लिहीत नाही. मला जमत नाही, मुळात मला जसा दिसलाय, मला जो या क्षणी जाणवतोय मी तो लिहितोय. या सगळ्यात मला दिसणारा श्री देव कलेश्वर हा डोंगर माथ्यावर एकटा राहणारा नाहीय, माणुसवस्ती संपन्न करून अध्यात्माचे होत्र मांडणारा आहे..जगण्यातील कला आणि कलेतील जगण्याला अध्यात्मिक अधिष्ठान देणारा आहे.. नेरूरच्या संपूर्ण कलापीठात जे एक प्रत्येकाच्या हातात उतरलेले जे कलापण आहे मला वाटत ती फक्त त्या डोईवरची चंद्रकलेची दिमाखदार प्रभावळ आहे.

नेरूरच्या कलेश्वराचा शिवरात्र उत्सव ही नेरूरसह 32 वाडीने जपलेला एक भला मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ऐवज आहे. साधारणपणे ८०० वर्षांची परपंरा या मंदिराला लाभलेली आहे. तब्बल पाच दिवसाचा असणारा उत्सव म्हणजे खर तर एक वेगळी शिवपौर्णिमा असते. पहिल्या दिवशी श्री मंगेश दर्शन पूजा, दुसऱ्या दिवशी पुष्पाच्छादित पूजा, तिसऱ्या दिवशी तंदुलाच्छादित पूजा, चौथ्या दिवशी शिवपंचायतन- उत्सवमूर्तीची महापूजा असते.  आणि पाचव्या दिवशी शिवपंचायतन रुपी उत्सवमूर्ती पूजा असते म्हणजे कलेश्वर, पार्वती, गणपती, नंदी, नाग असा पूजासोहळा असतो. हे पाच दिवस अनुभवणे म्हणजे श्रींच्या माथ्यावरच्या चंद्रकला स्थिर असतानाही महाशिवरात्रीला पूर्ण चांदणे पहाणे असते

कलेश्वराला असते तर शिवरात्र पण मान मात्र विष्णूरायाचा असतो हे अगम्य देवपण समजणे हरीहराचे एकत्व असते. पूजा शिवाची आणि पालखी वैष्णवांची का या प्रश्नापेक्षाही तो पालखी सोहळा पाहणे, त्या पालखीसोबत फिरणे आणि पुन्हा श्री मूर्ती मंदिरात आल्यावर दशावतारातील 'गणेश आख्यान ' पाहणे हे काय असते ते लिहू नाही शकत.. फक्त एकच विचार करा..  समोर गणपती आहे आणि आत श्री देव कलेश्वर आहे आणि आपण हे सगळं बघतोय.. भाग्यवंत असण्याचे एकक नसत हो जगात हे कितीही मान्य केलं ना तरी समाधानाचा फाटक्या झोळ्या शिवण्यासाठी एकदा गावच्या वार्षिकात सहभागी व्हा..

नेरूरच्या या मंदिरात फक्त श्री देव कलेश्वर आहेत असे नाहीत. तर या परिसरातील अनेक मूर्ती आणि मंदिर परिसर वेगळा आहे. शिवलिंगाच्या उजव्या बाजूस गणपती, डाव्या बाजूस नंदी आणि नंदीच्या मध्ये शुक्राचार्य आहेत. आणखी एक महत्वाची गोष्ट याच मंदिराच्या बाजूला असलेले श्री ब्रम्हदेवाचे मंदिर आणि त्याच्या बाजूला असणारे विष्णू लक्ष्मी , सावित्री व गायत्री मंदिर, ब्रम्हा विष्णू आणि महेश या सोबतीनेच इतर देवपरिवार या सगळ्याला भूमीलाच देवभूमी बनवतो.

नेरूरचे कलेश्वर मंदिर आणि शिवरात्रीच्या निमित्ताने आज नेरूर वासीय आठशे वर्षापासून आपला वारसा जपतायत. कोकणातल्या शिवरात्रीचा दिमाख औरच असतो, पण नेरूरच्या श्री कलेश्वरचा सोहळा तुम्हाला आजच्या व्हर्चुअल जगात शब्दश: थ्रीडी बनवतो. एरवी वर्षाचे बारा महिने तिथंच मंदिरात उभा असणारा देवाचा रथ जेव्हा प्रदक्षिणेला निघतो ना तेव्हा अस्मादिक देवादिकांची एक प्रदक्षिणा पूर्ण होते. आपण व्यावहारिक जगात वावरताना उंची हा शब्द खूप खुजा केलाय. कधीतरी या रथाकडे बघताना हा रथ कसा बांधला असेल , ही संस्कृती इथे कशी, आणखी कुठल्या मंदिरात हे रथ आहेत असे प्रश्न विचारत खोल खोल जाऊ ना तेव्हा रथावरचा शिवध्वज पार आभाळात भिडलेला असेल..

नेरूरचा महाशिवरात्र उत्सव म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आध्यात्मिक परंपरेची एक भव्य गाथा आहे.. कलेचा ईश्वर असणाऱ्या कलेश्वराची ही शिवभूमी आहे.. मला कधी कधी वाटते इथल्या विष्णूमहाराजांचे शिवसोहळ्यात सामील होणे हा एक संकेत आहे.. त्याचा पौराणिक अर्थ उमजला नसला ना तरी एक गोष्ट नक्की समजलीय..

ज्या ज्या वेळी, मन दोलायमान होईल त्या त्या वेळी डावा हात कंबरेवर घ्यायचा आणि उजव्या हाताचा अंगठा आणि तर्जनीचा चंद्र घेऊन कपाळावर धरायचा आणि एवढंच म्हणायचं..



- ऋषी श्रीकांत देसाई

Comments