मालतीच्या बनी तिथे

८ मार्चच्या निमित्तानं सोशल मिडीयावर आज महिला दिन सेलिब्रेट होतोय. त्याचवेळी फक्त एका दिवसांचा का असा जगातला प्रत्येक डे ला विचारणारा आणि आपण कसे वेगळे आहोत हे सांगणारा खटाटोप पण असतोच असतो म्हणा.. आणि या निमित्ताने करीयर, नोकरी, वैद्यक, न्याय, समाजकारण अशा सगळ्याच क्षेत्रातल्य़ा वुमन आयकॉनच्या गोष्टी नव्याने सांगीतल्या जातात. त्या सगळ्यांबद्दल मनस्वी आदर आहे. पण या परिघात अजुनही काही क्षेत्र आहेत. जी नजरे समोरची असतात आणि आपण नजरेसमोर असूनही आम्ही दरदिवशी विसरतो, त्याच्याबद्दल म्हटलं थोडसं लिहूया.. तर ही गोष्ट आहे, माझ्या गावच्या अर्थात मालवणच्या बाजारपेठेत स्वताच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख मांडणाऱ्या आजी मावशींची !

मुळात मालवणची ओळख असणाऱ्या सिंधुदुर्ग किल्याच्या बांधणीतल्या त्या अनाम नाबर लेकीच्या बलिदानाचे स्मरण करुन आमचं जगणं किल्यामुळे संरक्षित आहे ही जशी जाण आहे ना, तशीच ती याच किल्ल्यात स्वराज्यासाठी झुंजणाऱ्या छत्रपतीच्या स्नुषा ताराराणींच्या जिगरबाज संघर्षांची आहे. हे शहर माझ्या आईचे आहे, माझ्या आजीचे आहे ही एकदा भावना रुजली की सगळं बाईपण असं लखाखून उभं राहते.

मालवण ही तशी पूर्वापारची व्यापारी नागरी वस्ती. भूगोलाने दिलेला समुद्र आम्ही इतिहास आणि वर्तमानात धडाडी घेऊन जगत आलो.
मुळात व्यापार उदीम ही गोष्ट पुरुषार्थ म्हणून मांडणारी असेल तर त्याला छेद देणारी एक स्वतंत्र गोष्ट माझ्या मालवणने लिहीली आणि जपली. मालवणमध्ये समुद्रात जाऊन नवऱ्याने होडीने मासे मारून आणायचे आणि बायकोने ते बाजारात जाऊन विकायचं हे जे संसार चक्र होते ना त्यातच घरच्या बाईमाणसाकडे या समाजव्यवस्थेने दिलेलं अधिकारपण अधोरेखित होते.

मालवणच्या बाजारात खूप सारी दुकानं आहेत. पण आज मी  जातो तेव्हा मार्केटकडच्या 'माय'ला पाहिल्याशिवाय मला बाजार फिरल्याशिवाय वाटत नाही. इतरांच्या दृष्टीने माय रस्त्यावर बसणारी एक व्यापारी असेल. पण मायला समजून घ्यायला गेलात की तुम्हाला पेढीवर बसलेली सावकारीण वाटेल.. वाली फरसबी पडवळ हिरवा पाला लाल भाजी हे रस्त्यावर असूनही ते हायजेनिक असण्याचे एकक ते माय नावाचे आईपण देते.. ती माय किंवा मग भाजी घेऊन बसलेली आशा माय.. किंवा मग नेरूरकरांच्या पायरेवरची आलमेडा माय.. त्या कोण आहेत , त्यांचे घर कुठे आहेत या पेक्षा त्या तुमच्याशी कधीच अनोळखी नसतात. मालवणात काय हिम्मत कुणाची की मायने हाक मारली आणि तुम्ही ओ देता पुढे गेलात.. हा जो नात्याचा बंध आहे ना तो त्या रस्त्यावर विकत असल्या तरी मॉलच्या शतपटीने त्या ब्रँड आहेत त्यातून जुळलाय.

आज महिला दिनाच्या निमित्ताने सहज लिहायला गेलं आणि मला एक वेगळी गोष्ट जाणवली. की या बाजाराची जी मूव्हमेंट आहे ना त्या लीड करणाऱ्या अनेक महिला आहेत. आणि त्या प्रत्येकाची गोष्ट म्हणजे एक आयकॉनिक स्टोरी आहे.

अगदी सुरुवात कुठून करायची हा प्रश्न आला तेव्हा गोष्ट अगदी जुन्या मालवण बाजारात गेली. आणि नाव आठवलं, माई ओरसकर ! माई ओरसकर नावाच्या एका खमक्या बाईने केवळ व्यापार उदीम नाही केला तर व्यवसाय वाढीची गोष्ट लेकी सुनात रुजवली. येणाऱ्या प्रत्येक पिढीचा ब्रॅंड बनला पाहिजे ही गोष्ट समजून घेताना त्यातले माई ओरसकरपण नेमंक काय ते स्विकारलं पाहिजे. आज मालवणात गणेशोत्सवात येणाऱा प्रत्येक माणूस हा आठवणीने ओरसकरांच्या घऱात गणपती बघायला देवघरापर्यंत जातो, पण माहित नसेल तर सांगतो फार वर्षापुर्वी ज्यावेळी माणसं व्यापार उदीमासाठी यायची तेव्हा हीच माई ओरसकर होती जीच्या मुदपाकखान्यातही सगळ्यानाच प्रवेश होता. सामाजिक उद्धरणाचा हा जो प्रयोग होता तो आज काळाच्या कसोटीवर समजून घेणे गरजेचे आहे. कदाचित म्हणूनच मुंबईच्या महापौरांना मालवण म्हटल्यावर माई ओरसकर नावाची चव आणि आठवण ही प्रकर्षाने आहे. माईच्या निमित्ताने मग किरण ओरसकर, संगीता ओरसकर, प्रज्ञा ओरसकर, गार्गी ओरसकर आणि सुरेखा असा सगळा प्रवास ओघाने सुरू होतो.

जी गोष्ट माई ओरसकर या नावाची तशीच गोष्ट लली पाटकरांची .. पाटकरांच्या च्या कौलारु घरापासून ते भरडावरचे दुकान आणि जुना रॉकेलचा व्यवसाय या सगळ्यात जी लली पाटकरांची जी कमांड होती. ती मर्यादशील व्यवसायाची अचूक गोष्ट आहे. बर या सगळ्यात चेहऱ्यावरचे समाधान आणि करारीपण काल जसे होते अगदी आजही तसचं आहे. 

या सगळ्यात आणखी एक उदाहरण देतो.. आजही मालवणात बहुतांश गाड्या सर्व्हिंसिंगला जातात.. त्या नावात समीर शेखची आई अर्थात रझिया उमर शेख.. सर्व्हिसिंग लाइनमध्ये अम्मी ज्या तडफेने मुलाला आणि सुनेला साथ देतेय ती कमालीची गोष्ट आहे. दिवसभर ऑइल आणि पाण्यात भिजलेल्या त्या सासवासुनाना मी नटलेले हल्ली पाहिलंच नाही, हा पण आलेल्या प्रत्येक गाडीला लेक म्हणून सजवताना न्हाऊ माखू घालताना पाहिलंय.

एकदा का मालवण शहरातील ही आई ही गोष्ट सुरू केली ना की मग साप शिडीच्या खेळातील सहाचा ठोकळा असताना तुम्हाला नवा व्यापार हा खेळ मालवणच्या नकाशावर मांडून शिकवतील. आईपण आणि त्यांच्या कष्टातुन उभी राहिलेली या शहराची अर्थव्यवस्था हा विषय समजून घेता घेता तुम्ही रडाल अशी भावनिक कथा आहे.

देऊलकरची मसाले हे नाव शोधताना बाबू देऊलकरांची आई आज अनेकांना आठवत नसेल, पण एकेकाळी देऊलकारीन इल्याशिवाय सुकळवादचा बाजार सुरू नाही व्हायचा हे अप्रुप समजून घ्या. बाबू देऊलकरची आई, पत्नी आणि दोन्ही मुली या सगळयांचा समर्थपणा जाणवतोय. बाजारात अशोक सावंत नावाच्या राजकारणी माणसाचा पोटापाण्याचा व्यवसाय सावंत क्लॉथ स्टोअर्स आहे. त्याच दुकानात राजू सावंतची आई म्हणून बसलेल्या बाईने हा सगळा सुत्रकारभार हाती घेतलाय. पत्नी धर्म आठवताना सावंत क्लॉथ पाठोपाठ नेवाळकर आणि बॉम्बे च्या काऊंटरवर बसणाऱ्या काकी या केवळ रिप्लेसमेंट म्हणून तिथं बसत नाहीत तर त्या व्यवसाय कसा सांभाळावा हा वस्तुपाठ आहे. या सगळ्यात प्रत्यक्ष व्यवसायात नसल्या तरी राजेश पारधी यांच्या आईची पण बॅक ऑफिसची गोष्ट वेगळी आहे. तीन मुलांना उद्योगी बनवण यासाठी त्या माऊलीचे कष्ट अमाप आहेत.

एक गोष्ट नक्की आहे. मालवणच्या सगळ्या बाजरपेठेत दिसणारी जी महिलाशक्ती आहे ना ती नेतृत्व सांभाळणारी आहे. मेरी पिंटो सारखा एकाच वेळी पन्नास पेक्षा जास्त संसार उभा करणारा चेहरा आठवताना त्या काळात मत्स्य व्यवसाय हिमतीने शहराबाहेर नेताना दिवसभर बाई घराबाहेर राहून घर चालवायची हे विसरून चालणार नाही. तारी नावाची एक बाई भर पावसाळ्यात नवऱ्याने आणलेले मासे विकायची. म्हातारा तारी आणि म्हातारी हे जे समीकरण आहे ना ते खरतर एक बिझनेस मॉडेल आहे. मच्छी मार्केट म्हटलं की मग पंढरी बाई ते तोडणकर बाई ही फक्त नाव नाहीत तर त्या जिद्दीचे नाव आहेत

महिला म्हणून व्यवसाय कारकीर्द गौरव करताना मी एवढी वर्ष पाहतोय आजपर्यंत कुणी त्या टेलरिंग मशीनचा सन्मान केल्याचे मला आठवत नाही. गरिबीच्या दिवसात अवघ सावरताना फिरणाऱ्या त्या पायच्या चक्रात बाजारातल्या आडवलकर नावाच्या बाईचा संघर्ष ही आठवतोय. टेलरिंगच्या निमित्ताने मीना घुर्ये, रेश्मा नागवेकर, ज्योती पाडावे ही नाव आज ठामपणे व्यवसायात आहेत. लेडीज टेलरिंगच्या व्यवसायात भंडारी हायस्कूलच्या बाजूला असलेले चव्हाण यांच्या दुकानात तरी दोन बहिणी ते तीन सुना हा जो प्रवास आहे ना तो विश्वासरेष आहे.

या सगळ्यात मालवणमधलं जे आईपण आहे ना ते प्रामुख्याने फ्रंट लीड आणि बॅक ऑफिसमध्ये बिझनेस सांभाळते. किशोर खानोलकरच्या आईने हॉटेल ते गाड्या हा व्यवसाय उभा करताना केलेली मेहनत प्रचंड होती. मसाला हा एक ब्रँड जरी पहिला तरी पाडावे मसाले, संदेश मसाले आणि माय लेकी, केळुसकर मसाले आणि अमोलची आई , देऊलकर मसाले आणि हरेशची आई या सगळ्याचे जे बॅकफूट वर्क लोड आहेत तो सगळ्या काकीच बघतात. गोपीनाथ तांडेलची आई ते गव्हाणकर आजी या आठवणींच्या नावाने व्यवसायातली शिस्त आणलीय. कायम मेहनत म्हणजे काय हे जर बघायचे असेल तर भरडावरच्या किशोर सायकल स्टोर्सच्या मिठबाबकर बाईना एकदा भेटा. आणि त्या काळात मयूरा पिठाची गिरण नावाची हिम्मत कधी तरी माणगावकर या नावानेही सर्च करा.

एकदा त्या आठवल्या की मग मंदा तारी या रिक्षावालीची गोष्ट, किंवा आळवे बाईची चहा कॉफी बिजनेसच्या वेगळेपणाची गोष्ट सहज समजत जाईल. ओरस्कर हे मोठे दुकान असले तरी त्यात असणाऱ्या वाडकर बाईंची अजूनही काम करण्याची जिद्द तुम्हाला शिकवून जाईल !

या सगळ्यात समोर येणारे चेहरे जसे महत्वाचे आहेत ना तसे दोन चेहरे मला नेहमी जाणवतात. बाजारातल्या आशा देसाई आणि भरडावरच्या शोभा मालवणकर.. आंबा व्यवसाय आणि घर सांभाळणे यांच्यातली सायलंट मास्टरीची ही दोन नावे आहेत. आणि हाऊ टू बॅक ऑफिस वर्क हे जर शिकायचे असेल तर चित्रा उदी देसाई हे नाव आहेच की..

बाकी बाजारात मयु पारकरची आईदिप्ती दिपक पारकर, हर्षलची आई शाली बांदेकर,  शितल बांदेकर, उर्मिला पारकर, श्रद्धा पारकर, राजलक्ष्मी पारकर, निकीता  पारकर, स्वप्नाली पारकर, सापळे मिठाई वाल्या दुकानात आई आणि लेकीं , पाटकर कुटुंब, केनवडेकर कुटुंब , मंगल तायशेट्ये अशी कितीतरी नाव आहेत. मेघा सावंत ने आयुष्यातला सगळा बदल स्वीकारताना मालवणची ओळखीची ती चव कायम ठेवलीय हे विशेष !

आज बदलणाऱ्या शहरात वरुणकर हे फक्त दुकानाचे नाव नाही राहीलय. कुण्या धनंजय वरुणकरच्या आईने निर्माण केलेला जगण्यावरचा विजय आहे. स्कुबाच्या जगात अजित आचरेकरची बायको असणारी अन्वेशा किंवा मिनू परुळेकर किंवा, दिव्या तोंडणकर ही नाव आज नवी ओळख बनतायत. 

बाजारात आजही रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या नावात फुलवाली शकू आहे, साळगावकर , बिरमोळे, अशी कैक नाव आहेत. ज्यानी चार पैसे जास्त घेतले नाही पण दोन वालीच्या पेंडी जास्त टाकल्या ! फिरस्त्या व्यापाऱ्यांना ओळख नसते हा जगाचा सिद्धांत असेल पण मालवणच्या बाजारात याच बायकांनी पर्यटनासह शहराला ओळख दिलीय. त्यात तुम्हाला भाऊ झाट्येच्या दुकानासमोर बसणारी हडकारीन ठावक असला तर कुठल्या मोसमात काय विकायला हवे याची व्यापारी जाणीव म्हणजे काय ते समजेल !

आणखी एक विशेष गोष्ट सांगतो, पुरुष मंडळी राजकारणात आल्यावर सायकल टू इनोव्हा प्रवास करतात. त्याचा व्यवसाय करतात. पण या बाजारात आजही मी अनेक आजी माजी नगरसेवक महिलांना कसलीही लाज न बाळगता नारळ विक्री करताना पाहिलंय. हे एवढं सोपं नसते हो सगळं ! शिरपुटे नगरसेवक हे नाव घर, राजकारण सांभाळताना चरितार्थ विसरली नाही हे विशेष आहे

व्यवसाय करणे म्हणजे घोव भायर गेलो म्हणान काऊंटरवर बसणे एवढंच नसते. दुकान चालवणे, घर चालवणे, संसार चालवणे आणि या सगळ्यात परत 'कुंकू' लावणे असते. नाव खूप सारी आहेत, खूप नाव आठवत पण नाहीत. पण मुद्दा समजून घ्या की या शहराबद्दल मी नेहमी मी का लिहितो कारण या शहरात मला कधी आयकॉन कमी पडले नाहीत. नव्या नावाने नवा बायोपीक मला नव्याने दिसतो. गौरी विवेक पारकर ही नव्या घरची सून आज बार चालवते, त्याच वेळी सुरेश हॉटेल, पेडणेकर म्हणजे चंद्रकांत हॉटेल या देखील सुना चालवतात. 

शिरगावकर म्हणजे माणक्या एवढंच ठाऊक आहे. पण कधीकाळी माणिक नावाचे सुंदर नाव असणारी बाई आणि आज शिरगावकर काकी आणि तिची सून हा व्यवसाय पुढे नेतेय. भगवान हॉटेल म्हणजे सगळे पुरुष आठवतील पण मागे भट्टीवर वडे भजी सोडणारे मालकीणबाईचे हात दिसत नाही हे ही तितकंच खरं म्हणा. दीपक कामतेकरची बायको आणि मुलीचं दुकानात असणे हे दुकान चालवणे असते म्हणा ! राघव मिठाईवाल्या दुकानात आईचा तोंडवळा घेऊन पूजा आजगावकर तशीच उभी असते म्हणा. भरडावर पारधीयेच्या सुनबाई आणि बाजूच्या तेरसेच्या दुकानात असणारी ताई ही फक्त नाती नसतात तो नेतृत्व भाग असते. कुस्तानच्या बायकोने मांडलले पेपर दुकान हा वेगळा विचार आज पैशापेक्षाही किती मोठा होता हे समजत जाते. मग ओघाने खांडाळेकर जावा, आता दर्शना,  दर्शनाच्या निमित्तानं चारू कुणाल मांजरेकरच्या वाहिनीचे दुकान, कुणालच्या निमित्ताने मग समीर म्हाडगूतची पत्नी, मग तिच्या निमित्ताने लिरीसा अजय मुणगेकर, मग त्या निमित्ताने मग वैशाली गावकर यांचा केलेंडर व्यवसाय, आणि आमच्या ऋतूचा मित्र ऐशलीची आईचा फिरस्ते पॉलिसी कलेक्शन हे सगळं न संपणाऱ्या भरती लाटा आहेत.. 

नाव आठवायची तर प्रचंड आहेत...पळणाऱ्या खलाशाना जरब बसवणारी भर समुद्रात टॉलरवर जाणारी मेढ्यातली नाईक बाईंची गोष्ट जरूर आठवा. किंवा बांगीवाड्यातल्या चुडते वळणारी आरोलकर, किंवा गोलतकर हॉटेल मधल्या त्या दोघी, किंवा नाट्यगृहासमोर एकटीने वडा भजीचे दुकान चालवणारी मेस्त्री बाई असो किंवा मग भाजीवाल्या बशीर आणि मुश्ताकची आई आहे किंवा सरदारला मोठं करण्यासाठी शब्दश मोठं करणारी सरदारांची बायको असेल. किंवा देऊळवाड्यातल्या काश्याची मुलीने सांभाळलेला व्यवसाय असो किंवा मयेकरांच्या विजया बेकरीतला सगळा खमक्यापणाने सांभाळून घेणारा चेडू असात किंवा सीमा स्टुडिओ सांभाळणारी श्वेता असेल किंवा आमच्या देऊळवाड्याच्या समीर वर्दमची पत्नी साक्षी वर्दम असतील आणि त्यांचा स्क्रीन प्रिंटिंग मेहनतीचा बिझनेस असेल. किती किती आठवाव, अशा अनेक गोष्टी आहेत नाव संपतील पण पदर खोचून उभी झालेली ही आभाळ संपणार नाहीत.. बाकी नन्या गिरकरची आई, संदीप पेडणेकरची आई, उम्या हर्डीकरच्या आईबद्दल लिहायला अजून मोठा नाही झालोय मी !

व्यवसाय म्हणजे अनेकांना फक्त अपयश आणि संकट वाटतो ना त्या भर बाजारातल्या गाड दुकानातल्या प्रसाद गाड यांच्या पत्नीकडून एकदा धीरोदात्तपणा शिकावा बस्स ! अर्थात जगण्याच्या लढाईत मंदा उमेश बांदेकर समजल्या की तुमचे रडणे किती छोटे आहे ते समजेल ! ज्यांना ज्यांना आपलं रडणं हे खूप मोठे वाटत ना त्या प्रत्येकाने एकदा समोरच्या भट्टीतुन आणलेली राख पसरून त्यात कोळसे पेटवताना चिंध्याची चूल बनवून संसार उभा केलेल्या शोभा शिरपुटेची गोष्ट वाचा मग कळेल महिला दिन म्हणजे नेमकं काय ते..

आज शहर बदलत चाललंय, दुकान बदलतायत.. अनेक दुकानातले बाबा आता थकलेत, आईला पण दगदग नाही जमत त्यावेळी कुठल्या तरी युट्युबच्या लिंक मध्ये मालवण दिसते.. आणि आजोबांचे दुकान पायाला भिंगरी लावून सांभाळते तेव्हा ती फक्त नेहा नितीन तायशेट्ये या एका छोट्या मुलीची गोष्ट नसतेच.. ती गोष्ट बनते फुल नसलेल्या घमघमणाऱ्या सुवासाची.. बाजारभर अदृश्य छाप असणाऱ्या मालतीची !

मालवणच्या नाम महात्म्यात एक नाव मालतीचे बन असेही आहे. या शहरात आता मालतीची झाडं कुठे आहेत हा प्रश्न येतो ना तेव्हा प्रत्यक्ष झाड आज नाही दिसत. पण आजही या शहरात मालतीचा परिमळ घमघमत राहतोय. आजी, आई, सून आणि नात बनून आलेल्या मालवणच्या मालतीचा हा आलेख असाच उंचावत रहावा हीच त्या आई सातेरीकडे प्रार्थना
 
-ऋषी विजयश्री देसाई

मालवणातील ओळख - राहीचा भाऊ, जुइचा काका

(ठाऊक आहे, खूप नाव मिसिंग आहेत.. पण प्रयत्न समजून घ्या.. बस्स )

Comments

  1. अतिशय सुंदर लेख ऋषी. मला नेहमी मालवणचा ह्या साठी अभिमान वाटत आलाय की इथले अर्थकारण नेहमी महिलांच्या सहभागामुळे सजग राहिले आहे. तू घेतलीस त्याच्या अजून किमान दुप्पट तिप्पट नावे खरेच मालवण मधील व्यवसायात सक्रीय आहेत. त्यांना कधी कुठल्या पुरस्काराची आशा नाही, कुठल्या सन्मानाची आशा नाही. सातत्य आहे त्यांच्या कार्यात, पिढ्या पिढ्यांचे. बायकाच बायकांच्या शत्रू असतात, अस म्हणणाऱ्या लोकांना मालवण मधील हे उत्तर अगदी चोख आहे.
    मालवणच्या काना कोपऱ्यातील किती जणींच्या नावासकट आणि कामासह तू लेखात दखल घेतली आहेस, त्यावरून, मालवण तुझ्या काळजात आहे की तुझं काळीज मालवणात ठेवून तू तडे वावारत, ह्यो प्रश्न माका पडता.
    ह्या सगळ्या महिला शक्तीला माझे सादर नमन.

    ReplyDelete

Post a Comment