हरलेल्या राजाची गोष्ट


आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस.. मुळात मागच्या महिन्यात 20 तारीख उजाडलीच नसती किंवा 20 तारखेला काहीच घडलं नसतं तर कदाचित आज पक्षप्रमुखांऐवजी मुख्यमंत्री हाच उल्लेख असता. पण 20 तारखेनंतर जे काही घडत गेले त्यामुळे आता पक्षप्रमुख हाही शब्द धोक्यात आलाय. स्वतःच्याच 40 सरदारांनी मांडलेल्या युद्धात राजा अखेर हरला ! कोण जिंकलय याचा फैसला अजून व्हायचंय पण तूर्त तरी कोण कोण हरलय हे स्पष्ट झालंय.

उद्धव ठाकरे यांचा राजकीय प्रवास आज अनेकांना शांत आणि संयमी वाटत असला तरी या प्रवासाची सुरुवात जिथून झाली तिथून शोध घेतला की माणसाची राजकिय महत्वाकांक्षीपणा समजत जाईल. अनेकांना उद्धव म्हणजे महाबळेश्वरच्या सभेपासून उद्धव यांची सुरुवात वाटते, पण मला त्यांच्यातला बेरकी राजकारणी दैनिक महाराष्ट्र टाईम्स मटानायक पासून जाणवत गेला. विलासराव , आर आर, अशी मोठी नाव असताना उद्धव ठाकरे मटानायक बनले आणि सुरु झाला खऱ्या अर्थाने सामूहिक प्रभावाचा खेळ ! राजकारणात येण्यापूर्वीच राज आणि राणे यांच्यापासून भविष्यातील अस्थिरता उद्धव यांनी वेळीच ओळखली आणि मग घडला राज आणि राणे यांच्यावर दुसऱ्या वर्तुळात ठेवण्याचा खेळ.. राज आणि राणे बाहेर पडले आणि मग खऱ्या अर्थाने उद्धव सेफ झाले..

मुंबई महापालिका हातात होतीच पण विधानसभा हातात यायला 2014 उजाडलं, सगळा मानमरातब बाजूला ठेवून भाजपाला पुन्हा जाऊन युती करण्याचा निर्णय हाच उद्धव यांच्यातला सगळ्यात मोठा राजकारणी समजायला अनेकांना 2019  उजडावं लागलं. 2019च्या सत्तास्थापनेवेळी मी दोन विधान केली होती, विधान क्रमांक एक होते, शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना सत्तेत बसवलं ही पवारांची मोठी चूक आणि विधान क्रमांक दोन, या सत्तेने शिवसेना वीस वर्षे मागे जाणार.. अर्थात ही दोन्ही विधान आज खरी ठरत असली तरी त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बेभरवशीपणा गृहीत होता. शिवसेनेतच बंड होईल आणि शिवसेना मागे जाईल  असे मुळीच वाटले नव्हते.

उद्धव ठाकरेंना संघटनेची सवय होती, त्यांना प्रशासनाची ओळख झालीय. मुख्य म्हणजे आदित्यही या खेळात लीलया उतरलाय. पण तरीही आज प्रश्न पडतोय की उद्धव यांच्या हातात आज काय उरलय ? तसं पाहता एकनाथ शिंदे यांचे बंड हे लोकप्रतिनिधीचे बंड आहे आणि राणे यांच्या बंडावेळी पूर्ण संघटना आणि शिवसैनिक दुभंगला होता. आज तशी परिस्थिती नाहीय. पण एक बारकाईने गोष्ट समजून घ्या, मागच्या सगळ्या बंडावेळी खूप मोठं मोठं नेते शिवसेनेत होते आज खऱ्या अर्थाने उद्धव एकटे आहेत, प्लस पॉईंट फक्त एकच की मुंबईचा शिवसैनिक फुटला नाहीय. अर्थात महापालिका निवडणुका घोषित झाल्यावर खऱ्या अर्थाने फूट दिसणार आहे. आणि ती त्सुनामी ही शिंदेगटाच्या उठावा पेक्षा मोठी असेल.

महापालिका निवडणुकीत शिवसेनेला बसणारा फटका आणि मविआची निकालोत्तर भर ही उद्धव यांना जमेची बाजू आहे. अर्थात त्यातही उद्धव याना मुस्लिम मतांची बेरीज ही फायद्यात असेल. पण 2017 ची पालिका निकालाची परिस्थिती पाहिली तर कट टू कट परिस्थिती होती. भाजपसाठी यंदा निवडणूक फक्त कट टू कट च्या वर दहा जागा मिळवण्यासाठी उरलीय.

अर्थात या सगळ्यात प्रश्न उरतोय की आता उद्धव काय करणार ? खरंतर उद्धव यांनी काय करावे यापेक्षा तेव्हापर्यंत काय उरणार यावर गणिते अवलंबून असणार आहेत. आज संघटनेवर उडालेले लक्ष हा विक पॉईंट एकाबाजूला आणि दुसरीकडे विरोधक म्हणून असलेले चेहरेच उद्धव यांना सहानुभूती निर्माण करुन देतायत हा प्लस पॉईंट दुसऱ्या बाजूला या सगळ्यात उद्धव यांना आता आपला चेहरा निर्माण करावयाचा आहे.

शिवसेना संपणार की गोठणार या चर्चा निरर्थक आहे पण त्याचवेळी मुंबई महापालिका असो विधानसभा या सगळ्यात शिवसेनेचा प्रवास हा प्रचंड खडतर झालाय. आदित्यच्या रैलीला कितीही प्रचंड प्रतिसाद मिळाला तरी आता या दोघांना प्रचंड कष्ट घ्यावे लागणार आहेत. संघटना , कार्यकर्ता, नेता अशा तिन्ही पातळीवरची उभारणी सोपी नाहीय. अजून काहीच निराशा झाली नाहीय, राऊत यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे, तीच तलवार आदित्य, उद्धव यांच्यावरही येईल. कदाचित रश्मी या एकट्याही उरतील. पण जो शेवटचा उरेल, त्याला लढण्याशिवाय गत्यंतर नसेल. ते लढणे म्हणजेच ठाकरे असणे असेल.

पण या सगळ्या खेळाची सुरुवात आज तुम्हाला तुम्ही हरलायत हे मान्य करूनच करावी लागेल. वर्षा सोडून पुन्हा मातोश्रीवर येणे खूप सोपे होते. पण आता वर्षावर जायला वाट बांद्रा सिलिंक मलबार हिल अशी उरलीच नाहीय. आता वाडी वस्ती, सह्याद्री, खाचखळगे, प्रचंड निराशा, प्रचंड अपयश, पराभव आणि मग कधीतरी विजय हा असा भलामोठा प्रवास असणार आहे. 

तुम्ही हरलायत, आणि हरलेल्या जिंकायला अगोदर स्वतःला हरवावं लागते.. जमेल तेवढ स्वतःला हरवा याच वाढदिवसाच्या शुभेच्छा !

Comments