टिळक नावाचा सणसोहळा

"अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन व येथे जमलेल्या माझ्या मित्र-मैत्रिणींनो आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकांन बद्दल जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती."

बरं झालं आम्ही मागच्या पिढीत जन्मलो.. ज्यावेळी शिकायला पैसे पडत नव्हते, आणि शिकवणारे खरंच गुरु होते. स्वातंत्र्य नावाची गोष्ट बेंबीच्या देठापासून ओरडायला शिकवणारी होती. आणि सगळे राष्ट्रपुरुष हे समान होते, सगळे वंदनीय होते.. राष्ट्रीयत्व हे एका पक्षाचे नव्हते तर संपूर्ण देशाचे होते.. त्या काळात आम्ही शिकलो, आणि त्या काळात 1 ऑगस्ट म्हणजे खूप विलक्षण होता.

1 ऑगस्ट आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी यांचे नाते एवढे अतूट आहे की लोकमान्यांच्या 23 जुलैला जयंती असली तरी मन 1 ऑगस्टला 'टिळक' शोधत सुटते !   लोकमान्य टिळक यांनी राष्ट्राला आणि या देशाच्या पत्रकारितेला योगदान अफाट आहे.  ब्रिटिशांसमोर माफी न मागता बाणेदारपणे उत्तर दिले आहे तेच कालातीत आहे. 

लोकमान्य टिळक यांच्या पश्चात महाराष्ट्राच्या पिढ्यानपिढ्या जो विचारांचा आणि वक्तृत्वाचा वारसा घडलाय त्याची नोंद कुठे तरी केलीच पाहिजे. तसं तर सर्वच महापुरुषांची जयंती आणि पुण्यतिथी शाळा महाविद्यालयात साजरी होते, पण टिळक पुण्यतिथीतुन घडलेले धडाकेबाज वक्तृत्ववान आज शोधलेच पाहिजेत

टिळक पुण्यतिथी आज कोकणातल्या प्राथमिक शाळा यांचा जो ऋणानुबंध होता तो अफाट होता. 1 ऑगस्टला दोन अगरबत्ती आणि चार जास्वंदीची लालभडक फुले हा नित्यनेम होता. आणि खिशात वहीच्या टाक्यावरच्या दोन पानावर लिहिलेले भाषण ! अनेकांच्या आयुष्यात स्टेज डेअरिंग देणारा तो पहिला क्षण असायचा. "मी शेंगा खाल्या नाहीत मी टरफल उचलणार नाही" या वाक्यातला बाणेदारपणा तेव्हा न शिकवता यायचा.. आणि मग "एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो" याला परत जोर यायचा.. आणि त्यानंतर टाळ्यांचा कडकडाट.. लोकमान्य टिळक यांच्यामुळे आयुष्यात पहिल्यांदा टाळ्या मिळवलेले अनेक आहेत.. त्या सगळयांना आजचा दिवस पुन्हा आठवेल. पुण्यतिथी हा सण नसतो पण टिळक यांनी आम्हाला शाळेतला सण दिला, पाठांतर दिले.. टिळक पूजन करायला शिकवले.. काळाच्या ओघात वाणीसंस्कार आणि निडरपणा हरवणारी नेमकी या सणांची गोष्ट विसरलो आणि पुन्हा टरफलही उचलायला शिकलो..

आज हे सगळं सुरु आहे का ठाऊक नाही.. पण मालवण देऊळवाड्याची शाळा बघताना  तो शेंगदाण्याची प्रसंग इथेच घडला असेल ही जाणीव पुन्हा मन भरुन येते. टिळक जर मालवणात कधीकाळी शिकत असतील तर, त्यांना सिंधुदुर्ग किल्ला पाहताना काय वाटत असेल हा विचारच खूप प्रेरक वाटतो. खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या 1 ऑगस्टला चिंतनशील बनवतात.. पण या सगळ्या प्राथमिक शिक्षणपद्धतीला धन्यवाद ज्यांनी वक्तृत्व नावाची गोष्ट शिकवली. विचार करायला शिकलो.. 

आणि म्हणूनही पाऊस असो वा नसो, त्या लाल जास्वंदीच्या पाकळ्यांवर थोडेतरी दवाचे पाणी असतेच असते..

"एवढे बोलून मी माझे चार शब्द संपवतो"

- ऋषी श्रीकांत देसाई
भरड कन्या शाळा, मालवण

Comments

  1. खरंच आज इयत्ता दुसरी आठवली... 👌👌👌👌

    ReplyDelete

Post a Comment