नागमंडल


सकाळीच घरात शेण सारवक घेतल्यानी.. तेंनी शांतपणे फक्त वरन खाली बघल्यानं.. तसा रेग्युलरचाच होता, पण फाटेचा काय येवजल्यानं म्हणान तो बघित बसलो.. वायच जमिनीवर आणि रवलेला भितीर श्यान चढला.. तशी वायच घायच होती म्हणा.. जमिनीवयलो वास वर पाशीटापर्यंत परमाळलो.. 

कवलातलो जागो झालो.. कवलातलो सरसावरन सळप्यातसून चारय कोनवाश्यातसून फिराक लागलो.. सगळ्यांका साद घातल्यान.. एक एक सरसरावन भायर पडले भीतीच्या रोखान, भीतीवरन थेट सळप्यात !

एकाएकाचा रूप काय सांगायचा.. कौलावरचो तर मुळातच देखणो.. पण मागच्या पाच मिनिटात जा काय तेज होता जणू काय नळ्यातच लायटिंग केल्यासारख्या  !

कौलातलो आज यजमान होतो, त्याच्याबाजूक ओसरेतलो बिलगान रवलो, बाकीच्यांनी आपापल्या मानपानान जागा घेतल्यानी.. यंदा पावनो भाऱ्यातलो होतो. . तसो तो रवाक पडयेत असायचो.. पण आज आकीताचो मान तेचो होतो.. मस्त हिरवो हिरवो होतो. तवसर कुडनातलो इलो..घरची माणसा इल्यार मग खाली बघूक लागली..

भिंतीवर चुन्याच्या भांड्यात रंगलेल्या बोटांनी चित्र उमटाक लागला.. आणि साकारत गेला काळजात वेटोळा घातला गेलेला दरवर्षीचा मामाचा चित्र.. फनो रोखलेलो पण देवाचा रूप असलेला ता अगम्य रूप भीतीत घट्ट उमटला होता. निश्चल असला तरी केव्हाय अचल होयत इतक्या खरा !

वर कौलातसून बघणारे सगळेच हरकान गेले. भीतीवरचा चित्र, तेच्या समोर पाटावरचा पिवळा धम्मक मातयेचा रूप, त्याच्यावर वेली, दुर्वा, पत्री, लाहे, दूध, पातोळे.. सगळो थाट घराचा मंदिर करनारो होतो.. तितक्यात घरातला बारक्या इला आणि पाटावरच्या मातीच्या नागाच्या जिभेत अलगद दुर्वा टोचल्यान आणि वर सळप्यात असलेल्या सगळयांच्या अंगावर शहारो इले..  नुसता ईळइळला रे !!

पूजा आटापली , निवेदाचा एक पान तुळशीकडे ठेवला गेला.. आणि बाजूच्या आंब्याच्या जवळच्या प्याडात असलेलो राखणदार त्या निवेदाच्या वासानच हसलो.. वर्षभर अमावशेचे नारळ आता फुटनत नाय, राखणदाराच्या मानाची गाराणी आता आयकाक नाय येनत.. पण ह्यो एक दिवस तेचो असता.. तो प्याडात गप्प पडान असता, मानपान कुळाचार विसरल्याचे जखमा बघीत.. पण घरातले भायर गेले तरी राखणदाराक पयसो नसता ना कमवचो.. तेका घराभवतीच रवाचा असता.. राखण करीत !

पण तेंकाय ठावक हा, संध्याकाळी अळवात तो पाटावरचो येतलो आणि पडलेल्या पावसात तोय निघान जायत आणि मग कवलातलो, पडयेतलो, कुडनातलो फिरत रवतत म्हातारेचा घर सांभाळत 

आणि हा, राखणदार मात्र तसोच रवता वर्षभर भिंतवरचा ता तसाच रवलेला रूप बघीत...

- ऋषी

Comments