तूच सूर ठावा मजसी !


गणेशोत्सव आणि या कोकणभूमीचे नाते अलौकिक आहे. 'श्री गणरायाची जन्मभूमी हिमाच्छादित आहे' असे जर पुराणात वाचले नसते, तर या कोकण प्रांताच्या गणेश प्रेमाचा आनंदसोहळा पाहून  कोणीही क्षणभर त्या कथेला कदाचित कोकणाच्याही संदर्भात एखाद्या कथेत जोडले असते एवढे सगळं अफाट वातावरण गणेशोत्सवात असते. कदाचित ही अतिशयोक्ती वाटेल पण एक नक्की की, या लाल तांबड्या मातीने या रक्तवर्णीय रुपात आपलं जगणे शोधलंय. 'गणपती कधी येणार आहे' या तारखेपेक्षा कोकणवासीय हा पाच सात दिवसांचा जो काळ असतो ना तो आपले वर्षाचे उरलेले 360 दिवस जगत असतो. गणपती या नावाच्या ज्या गणेश लहरी असतात त्या मुंबईकर चाकरमान्याला  पैशाच्या मोहातून गावी ओढून आणतात, आणि गावच्या पैसे नसलेल्या जगण्यातही खरी श्रीमंती म्हणजे गणेशोत्सव उलगडून दाखवतात. कोकणचे गणेशउत्सवात जे एक सामाजिक आणि सांस्कृतिक आख्यान असते ते कोणीही कितीही लिहू दे, ते त्यापल्याड जाऊन आसमंतात भरुन राहणार हे कालातीत आहे.

कोकणच्या गणेशोत्सव परंपरेत जी गोष्ट ठळकपणे जाणवते ती गोष्ट म्हणजे, कोकणची भजन संस्कृती ! केवळ भजन हा शब्द जरी उच्चारला तरी कानात मृदुगांची थाप, टाळेचा नाद, पायपेटीची सरगम आणि कोरसात ऐकू येणारा आवाजाचा नाद कल्लोळ ऐकू येतो. सारवलेल्या जमिनीपासून ते फ्लॅट कल्चरपर्यंत कोकणातल्या गणेशोत्सवात भजन नावाची गोष्ट आज कला राहिलेली नाहीय, तो चाकरमानी आणि गावकऱ्यांसाठी ऑक्सिजन बनलाय. 

आज कित्येक पिढ्या भजनातुन समृद्ध झाल्यायत याचा हिशेब नाही, पण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भजनातून पिढीदरपिढी शास्त्रीय बाज मात्र वारसा बनून नव्याने जिवंत होतोय. आज अनेक लोककलेतुन पारंपारीकपणा हरवत चाललेला असताना, भजन कला मात्र आजही जेवढी आपल्या पारंपारिकपणाला घट्ट धरुन आहे त्याचवेळी भजन हीच पहिली कला आहे की जी नव्या तंत्रज्ञानाच्या साथीने बहरत गेली. आज लोककलेसमोर अनेक आव्हान असताना बदलत्या जगावर आरूढ होऊन त्या तंत्रज्ञानावर विजय मिळवून  पुन्हा भजन पुन्हा टिपेला भिडते.

भजन आणी डबलबारी हा विषय कालही प्रासादिकपणाच्या निकषावर मोठा झाला आणि आजही त्याच निकषावर आपला रसिकजन बांधतोय. आज ट्वेन्टी ट्वेन्टी सारखे भजनातून नवीन काळ पुढे सरकत असला तरी त्या प्रवाहात मूळचा शास्त्रीयपणा सिद्ध केल्यावरच मग रसिक तुम्हाला सिद्ध करतात हे वास्तव आहे. आज या संपूर्ण भजनकलेकडे पाहताना हा पूर्ण इतिहास अनेकांना नावानिशी मुखोदगत असला तरीही कोरस, टाळकरी अशा माध्यमातून तो पुन्हा उरतो आणि मग पुन्हा हा इतिहास आपल्या संपन्नपणाच्या मर्यादा आणि लिहित्या शाईच्या मर्यादा उलगडतो.

कोकणच्या भजनसंस्कृतीत गावकुसाचे जे प्रगल्भपण आहे ते मान्यच पण मुंबईच्या भजनीबुवांचे आणि आजही सुरू असलेल्या त्या अखंड परंपरेचा वारसा जाणून घेणे जास्त गरजेचा आहे. मिलच्या काळापासून ते प्रायव्हेट सेक्टरचा जॉब सांभाळून रात्री पुन्हा मंडळाच्या एका खोलीत किंवा नव्या हॉलमध्ये भजनाच्या सुरावटी बांधताना जो सराव होतो त्याला सराव म्हणजे केवळ अशक्य.. ऑर्गन, टाळ, चकी आणि मृदुगांची थाप असा नादाचा सोहळा सुरू झाला की ती अखंड मैफल असते.. अनेक प्रख्यात बुवा आपल्या शिष्यांना शिकवत हे स्वरहोत्र अखंड प्रज्वलित ठेवतायत..

खरंतर या निमित्ताने किती हो भजनी कलावंतांना आठवणार ? आजघडीला पूर्ण मुंबईत हजारपेक्षा जास्त भजनी मंडळी भजनकला टिकवून नवे भजनी कलावंत तयार करतायत.हिंदी -मराठी चित्रपट सृष्टीचे सुप्रसिद्ध संगीतकार बुवा स्नेहल भाटकर, महादेव कोळी, गोपाळ दांडेकर, शिवराम वरळीकर, पहाडी आवाजाचे बादशहा बुवा वामन खोपकर, बुवा परशुराम मोर्ये, दयाळ बुवा (राजहंस), मारुती बागडे,अर्जुन तावडे,बाबुराव निपाणी,गणेश नाथ हयांचा आणि अशा अनेक नावांचा पारंपरिक प्रासादिक भजनाचा एक काळ होता. त्याच सुरावटीवर कोकणचे ब्रम्हा विष्णू महेश प्रकटले. कोकण कला भूषण बतावणीचे बादशहा चंद्रकांत कदम बुवा, संगीत भजन महर्षी परशुराम पांचाळ बुवा , हरिनामाचा झेंडा लंडनपर्यंत घेऊन जाणारे संगीतरत्न भजनसम्राट विलासबुवा पाटील बुवा.. या तीन महागुरूनी भजनी कलेला एका निर्णायक काळात ग्लॅमर मिळवून दिले. त्याचबरोबर मालवणीवर जबरदस्त पकड असलेले काशीराम परब बुवा,संगीत भजनसम्राट चिंतामणी पांचाळ,इत्यादी दिग्गजानी भजन परंपरा सन्मानाच्या  उंचीवर नेऊन ठेवली.  त्यांनंतरच्या पिढीत सन्मा. कदम बुवा ,पाटिल बुवा,पांचाळ बुवा, याना त्रिमुर्ती असेही संबोधले जाते.. वरील पैकी सर्व जेष्ठ श्रेष्ठ. बुवांच्या पंक्तीत बसणारे बुवा म्हणजे बुवा गोपीनाथ बागवे त्यांचेही अनेक शिष्य भजनाचा प्रसार प्रचार करीत आहेत. 

भजन ही गोष्ट समजून घेताना त्या त्या काळात या सगळ्या मंडळींनी ही संस्कृती जपण्यासाठी जे रियाजसायास केले आहेत ना त्याची गोष्ट शब्दबद्ध करणे म्हणजे खरंतर पीएचडीचा विषय आहे. मुळात गावची भजनसंस्कृती टिकवून ठेवण्यात मुंबईकर बुवा आणि नोकरदार चाकरमानी याला जो त्या त्या काळात पुढे नेण्याचा प्रयत्न केलाय त्याचे नोंद आणि दाद ही शब्दातीत आहे. चाळीतली एखादी खोली त्यात सुरावट  आणि मग गावी गेल्यावर यंदा 'नवीन गाण्याची' उत्सुकता या सगळया गोष्टी मला नेहमीच प्रेरक वाटतात. ज्यावेळी पडद्यावरचा सिनेमा आला त्या वादळात भल्याभल्या कला अस्तित्वाचा संघर्ष करत होत्या, आणि त्याच वेळी कोकणची भजनकला मात्र अढळपद मिळवत होती. तीच गोष्ट केसेट युगातही होती. मुळात भजनकलेकडे पाहताना ही कला बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर स्वतःला बदलवत गेली नाही, तर स्वतःला त्या फॉरमॅटमध्ये स्वतःला सिद्ध करत गेली.  

आजच्या लॉकडावूनच्या काळातही ज्यावेळी कवी गोविंद उर्फ राजा दळवी यांनी ऑनलाइन डबलबारी तीही फेसबुकच्या माध्यमातून पहिल्यांदा आणली तेव्हा अनेकांना ती फक्त 'असच काहीसे' वाटले. पण आज मात्र सिंधुदुर्ग लाईव्ह सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर म्हणजेच कोकणच्या महा चॅनल वर आज डबलबारी , भजन स्पर्धा रंगतायत  हे खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे. आज सागर चव्हाण   मोबाईलकडे वळणाऱ्या नव्या पिढीला त्याच्या मोबाईलमध्ये भजन प्रकाराची गोडी लावतोय हे विशेष.. कोकणसादचे सागर चव्हाण असोत कोकण नाऊचे विकास गावकर असोत किंवा रुपेश नेवगी , प्रत्येकाची भावना तीच आहे की भजन  आजच्या पिढीपर्यंत नव्या तंत्रज्ञानातही पोहोचले पाहिजे.

आज वर्तमानकाळात नारायणी नमोस्तुते कॅसेटमधील आरत्यांच्या माध्यमातुन घराघरात पोहोचलेले भजनसम्राट बुवा भगवान लोकरे, भजनसम्राट बुवा रामदास कासले, भजनसम्राट बुवा श्रीधरजी मुणगेकर, बुवा नारायण वाळवे , प्रमोद हरयान, लक्ष्मण गुरव, प्रमोद धुरी इत्यादी मंडळींनी आता वयाची साठी पार केलेली असून आजही मुंबईत राहून डबलबाऱ्या, भजने करीत असतात ह्या मंडळींचा शिष्य सांप्रदाय खूप मोठा आहे. 

मुंबईच्या गुरूंचे गावात आणि गावाच्या बुवांचे मुंबईत शिष्यगण आहेत. अगदी आमच्या स्वर्गीय कृष्णा पवार बुवा पासून ते आमच्या भालचंद्र केळुस्कर बुवापर्यंत हा अखंड सूरप्रवाह आहे. 
किती नावे आठवायची हा प्रश्न खूप मोठा आहे.मुंबईतील नवे जुने सुप्रसिद्ध बुवा असे जरी आठवले तरी दिपक चव्हाण, विनोद चव्हाण, सुशिल गोठणकर, संतोष शितकर, चंद्रकांत जाधव, स्वप्निल मेस्त्री, सुनील जाधव, हिरोजी बाणे, विशाल मसूरकर, संतोष जोईल, कृष्णा काडवे, सतिष सावंत, दुर्वास गुरव, किरण शिद्रूक,श्रीकांत शिरसाट यादी संपणार नाही.. 

बरं ती नाव आठवताना गावच्या नावांची गोडीही अवीट आहेच. संतोष शिर्सेकर, प्रकाश पारकर, संदिप लोके, विजय उर्फ गुंडू सावंत, समीर कदम, अभिषेक शिरसाट, संतोष कानडे, संदिप पुजारे, अरूण घाडी,दिप्तेश मेस्त्री, रुपेद्र परब, गौरव पांचाळ, सुंदर मेस्त्री ही नाव म्हणजे सरगममधील एक एक चीज आहे. थोडे पुढे जाऊन रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गचा समग्र आढावा घेतला तरी नावे आठवतील. सुनिल जाधव, नारायण मिरजुऴकर, द्वारकानाथ नाटेकर , चंद्रकांत  तिर्लोटकर, विजय परब, गणेश पांचाळ, अजित गोसावी,अजित मुळम
कै.विलासराव देशमुख, विद्याधर चोरगे ही आणि।अशी अनेक नावे आहेत. 

अर्थात यात मागील काही वर्षात महिला भजन कलावंतानी आपली वेगळी छाप निर्माण केली. पुरुष बुवांच्या ताकदीने महिला भजनी कलावंताची ओळख अधोरेखित होतेय. अगदी आवर्जुन उल्लेख कराव्या अशा भारती मढवी, निशा शिंदे -टेमकर, मंगला चव्हाण, योगिता परब या स्वरांची जादूही औरच आहे.

हा नामोल्लेख सोहळा नाहीय तरीदेखील प्रत्येक नाव हे या प्रवासाचे भोई आहेत. भजनी आणि प्रासादिक काव्य रचनेवर हुकूमती ताकद असणारे जयंत रेवडेकर, भारुडसाठी कथानक काढणारे डोंबिवलीचे पांडुरंग कुंटे, नवनवीन संकल्पना, नवनवीन विषयाला वाचा फोडणारे गजर , गवळण, कव्वाली वगैरे सर्व प्रकारचे लिखाण करणारे कवी गोविंद उर्फ राजा दळवी.. त्यांच्यासोबत भजनी कला जगावी, फुलावी म्हणून कायम कार्यरत असणारे गीतकार राजा सामंत, या प्रत्येकाचे काम अफाट आहे.

भजनात महत्वाची गोष्ट म्हणजे साथ संगत मृदुंग म्हटला की सर्वात अगोदर नाव येत ते म्हणजे वालावलचे गजानन देसाई , राजाराम सुतार, डॉ. दादा परब, मृदुंगाचार्य ज्ञानेश्वर उर्फ माऊली सावंत, ह.भ.प. शिवाजी बुधकर महाराज.. तुम्हीच सांगा किती नाव आठवू.. एका एका नावाने मृदुगांवरची थाप आसमंतात नादब्रम्ह उमटवेल... नवजुने मुंबई ग्रामीण या पल्याड भजनाशी प्रामाणिक राहून अखंड सुरू असलेला हा नामसंकीर्तन सप्ताह आहे जणू !

केवळ हीच नाही तर अशी अनेक नावे आहेत, आणी प्रत्येक नाव दैवतसमान आहे. आज भजनी कलेत प्रत्येकाने खुप मोठे योगदान दिलंय. सगळीच नावे आप आपल्या शैलीने या क्षेत्रात अढळपद मिळवलेली आहेत. या लेखात नामोल्लेख कदाचित झाला तरी त्यांचे नाव आठवणे हे त्या त्या बुवांचे अढळपद आहे.

मला माहित आहे, मी कितीही नाव लिहिली तर एक दोन नाही तर शेकडो नाव माझ्या लिखाणातुन राहून जातील. पण भजनकला समृद्ध करताना प्रत्येकाचे श्रेय फार मोठे आहे. टीव्ही आला आता भजनाचे काय होणार, टेप आल्या आता भजनाचे काय होणार, व्हीसीआर आले आता भजनाचे काय होणार, सीडी आल्या, एमपी थ्री आल्या, यु ट्यूब आले , ऑनलाइन आले.. दरवेळेला एकच प्रश्न पडायचा आता भजनाचे काय होणार.. भजन आहे तिथेच आहे, येणाऱ्या प्रत्येक नवीन तंत्रज्ञानावर भजनी कलेने राज्य केले आणी यापुढेही भजन अढळ असेल ध्रुवासारखे.. ती अनेकांसाठी कला असेल पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या प्रत्येकासाठी ती अभिमान आहे.. आणि म्हणून जेव्हा गणपतीचा उत्सव येईल त्या प्रत्येक क्षणाला भजन लोककला आठवत राहील आणि ओठी शब्द येतील..

  'तूच सूर ठावा मजसी'

Comments