पिवळ्या रिबिनीची मूठ

मित्रा, नमस्कार.. कसा आहेस ? खूप दिवसांनी बोलतोय.. मजेतच  असशील म्हणा.. मागच्या दोन वर्षात समाज हळूहळू आपल्यापासून दुरावत असताना नेमकं दुरावलेपण म्हणजे नेमकं काय हे शोधत असतांना आज तू आठवला आणि म्हटलं आज तुझ्याशी बोलूया.. तुझ्यासारख्या मित्रांना चेहरा नसतो, तो वेगवेगळ्या वळणावर येतो आणि आठवत राहतो स्वतःला शोधताना..


काही लॉजिक असतात आणि त्या गोष्टी कधीच कुणाला समजत नाहीत. पहिलीतून दुसरीत जाताना किती मित्र दिसेनासे झाले. मग चौथीतुन हायस्कूलात जाताना पाचवीत किती मित्र सोबत आले? सातवीतून आठवीत जाताना ? दहावीतुन अकरावीत जाताना ?  बारावीतून फर्स्ट इयरला जाताना ? थर्ड इयरमधून पोस्ट ग्रॅज्यूएशन करताना ? कधी शोधलय का किती मित्र उरलेयत आपल्याबरोबर शिक्षण नावाची गोष्ट आपल्यासोबत पुढे सरकताना ?


आणि मग आयुष्यात स्ट्रगल येतो. नोकरीसाठी गाव बदलत जातो. मुंबईत आल्यावर मग मित्र नावाची गोष्ट किती सरळ दोन टप्यात विभागते. ऑफिसमधले आणि ओळखीचे मित्र.. ह्या ओळखीच्या मित्रात समान धागा गाव असतो.. हाच धागा मग व्हॉटसअपवर क्लासमेट म्हणून मिरवतो. त्यातही दहावीची बॅच, मग जमलं कॉलेजची बॅच, खूपच घनिष्ठ असलं तर मग शाळेतील त्यातही पुण्यवान असलं तर मग चौथीपर्यंतचा पूर्ण प्राथमिकचा ग्रुप जोडला जातो.. आम्ही कनेक्ट आहोत हे सांगताना बोलतोय की फक्त पाहतोय ही गोष्ट तुम्हाला वेगळं ठरवते.. पण या सगळ्यात प्रत्यक्ष संवाद मात्र रिता राहतो. 


हवं कशाला मित्रांशी बोलणे हा आपणच आपल्याला विचारलेला सवाल आपल्याला आपल्यापासून तोडत निघतो. एक साधा प्रश्न तुमचा पहिलीतला मित्र आता कुठेय ? किंवा मग वेगवेगळ्या टप्प्यावर भेटलेल्या मित्रांच्या जगात आता काय चाललंय याची जरा तरी जाणीव आहे का ?


या प्रश्नाचे दुःख कधी समजते ठाऊक आहे का जेव्हा तुम्ही गावाला जाता आणि तुमच्याकडे बोलायला तुमचा मित्रच नसतो. त्यावेळी हातावरच्या  यलो रिबिनी आठवतात, स्लॅम बुक नावाची गोष्ट आठवते.. कटवडापासून कॉकटेल, स्वतःच्या माळ्यावरच्या बॅटपासून ते मित्राला मुंबईहून द्यायला आणलेल पण खूप महाग आहे म्हणून परत तसेच कपाटात ठेवलेल्या टीशर्ट पासून अनेक गोष्टी आठवतात..


मित्र आठवण्याचा सोहळा हा प्रत्यक्ष संवादातून व्यक्त व्हायला हवा.. बोलायला हवं, भांडण करायला हवं आणि पुन्हा बोलायला हवं.. किती वर्षे आहेत अशी हातात ? तुम्हाला कोणाची तरी गरज आहे यापेक्षा तुम्हालाही बोलायला कोणाची तरी गरज आहे हे समजून घ्यायला आहे.. कुणाचीच गरज नाही हे निर्मोहीपण हवंय कशाला ? आणि ते घेऊन एकतर हिमालयात जाणार आहात का ?  प्रत्येक मित्राची गरज पैसा हीच नसते.. खूपवेळा संवाद हीच दोन मित्रांच्या नात्यातील सुदाम्याची पुरचुंडी असते..


बरं आता वय रिबिनी बांधण्याचे नाहीय आणि ग्रीटिंग्ज द्यायचे नाहीयत... पण एक मित्र लागतो, समुद्राच्या धक्यावर तुमच्याशी बोलायला वाट पाहणारा किंवा एकटेच असताना गावाकडून रेल्वे स्टेशनवर सोडणारा... अगदीच आंब्याची पेटी पाठवणारा नसला तरी चालेल पण आठवणीने संध्याकाळी चल चहा भाजी खायला अशी साद मारणारा..


वाळू वेगाने सरकतेय.. त्या घड्याळातील वाळू नाही अडवू शकत... जमलं तर आठवतील तेव्हा सगळे मित्र ओंजळीत घट्ट पकडून ठेवा.. पिवळ्या रिबनीत बांधून !!

- ऋषी देसाई

मैत्री दिनाच्या शुभेच्छा !

Comments

Post a Comment