रेवंडीची आई भद्रकाली

ॐ जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तु‍ते।

नवरात्र उत्सवात देवीच्या वेगवेगळ्या मंदिराबद्दल लिहिताना एक वेगळीच ऊर्जा मिळते. गावोगावच्या ग्रामदेवता आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या रुपाबद्दल लिहिताना त्यातली जी सकारात्मकतेची गोष्ट असते ती नवस गाऱ्हाणे या पल्याड नेली पाहिजे म्हणून ती लिहावी लागते, सांगावी लागते.. आणि म्हणूनच हा जागर उत्सव !

देवीच्या रुपात महाकाली रुपाबद्दल आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. बंगालच्या कालीपूजनाची आणि महाराष्ट्रातील कालीरूपाच्या अवताराची महती समजून घेतली की एक प्रगल्भपणा आपल्याला त्या विस्मयकारीपणा देतो. 

मुळात कालीका समजून घेताना दक्षिण काली, मातृकाली, महाकाली, श्यामा काली, अष्ट काली, गुह्य काली अवतार उलगडत जाताना त्याच पुराणाच्या पानांवर उलगडते आई भद्रकाली. भद्रकाली पूजनाच्या प्रथा ह्या प्रांतागणिक बदलत जातात हे आवर्जून लक्षात ठेवले पाहिजे. 

एक ओळ आहे की, "भद्रं मंगलं सुखं वा कलयति स्वीकरोति भक्तेभ्योदातुम् इति भद्रकाली सुखप्रदा".. जी आपल्या भक्तांना देण्यासाठी मंगल , भद्र  प्रदान करते त्या भद्रकाली कायम सर्वांना सुखी ठेवते.

नवरात्रीच्या पहिल्या माळेला आज सोमवार म्हणजे शंकर स्मरताना , आईचे स्मरण करताना पार्वती रूप स्मरण करताना  भद्रकालीला आठवताना शक्ती आणि भक्तीची एकरूपता रेवंडीच्या भद्रकालीत मंदिरात स्मरताना अप्रुपादेही भिनत जाते.

मुळात रेवंडीच्या भद्रकालीची कथा समजून घेतली तर त्यातील पुराणपणाचे संदर्भ थक्क करतात. अशी धारणा आहे की, एकदा देवी पार्वती माता भगवान शंकरावर रुष्ठ होऊन या निर्जन व निसर्गरम्य अशा मनोहर ठिकाणी येऊन राहिली. तिची समजूत काढण्यासाठी भगवान शंकर अनेक देवता व आपल्या गणांसह येथे अवतरले. 

माता पार्वती संतुष्ट झाल्यावर उभयतांनी आमच्या येथे कायम वास राहील व आमच्या भक्तांचे सदैव रक्षण करू, असे वरदान दिले. त्याचबरोबर आपल्या सवे आलेल्या देवता व गण यांना त्यांचे उचित स्थान निर्माण करून दिले व वर्षातून एकदा तुमच्या भेटीसाठी येईन, असे वचन दिले. 

पुराणकथा या कथा असतात, पण तरीही माता पार्वती कैलास सोडून या क्षेत्री आली हे समजल्यावर आता देवीला पाया पडताना डोळे नक्की भरुन येतील. त्यात कांबळीच्या पूर्वजानी ह्या शिवशक्तीला निर्गुणातुन सगुणात पूज्य बनवताना जो विचार मांडलाय तोही श्रद्धेच्या आयामाचा एक वेगळा विचार आहे.


रेवंडीच्या भद्रकाली मूळ मंदिराची स्थापना सुमारे ४०० वर्षांपूर्वी झाली होती. आताचे मंदिर नव्या शैलीत बांधण्यात आले असले तरी मूळ मंदिराची आठवण करून देते. मुळात बदल आवश्यक आहे पण त्यात जे एक प्रसन्नपण हवं असते ना ते रेवंडीच्या आईच्या मंदिरात नेहमी जाणवते. मंदिर हे नेहमी गाभाऱ्यात असते. आणि ते फक्त उत्सवात नाही तर कायम चैतन्यदायी असले पाहिजे.. पायऱ्या चढून गाभाऱ्यापर्यंत पोहोचताना टप्प्याटप्प्यावर देवी दिसत जाते, आणि मग उत्कटता हा शब्द जिवंत होतो.  या मंदिरात श्री शंकर व पार्वती या उभयता देवतांची काळ्या पाषाणाची लिंग स्वरूपात पुजास्थान दिसते. हे अर्धनारीनटेश्वराचे एकरूप स्वरूप आहे. म्हणून या शिवशक्तीच्या क्षेत्राची गाथा समजून घेणे जास्त गरजेचे आहे. 


कधीतरी फक्त शांत बसायचे असेल, आपल्याला आजपर्यंत मिळालेल्या कृपावरदानाबद्दल स्वतःच स्वतःशी बोलायचे असेल तर रेवंडीच्या मंदिरात नक्की जा.. आई वाट बघतेय तुमची !

ऋषी श्रीकांत देसाई

Comments