कुणकेश्वरची आई जोगेश्वरी


खरतर लिहिण्यासारखे आज फार काही नाहीय, आणि म्हणूनच खूप लिहायचय ! मी साधारणपणे आज मागची काही वर्षे नवरात्रात देवीबद्दल लिहिताना आपण फक्त दिवट्या मिरवण्याचे काम करतोय ही भावना जिवंत असते..

अनादी माया मुळ स्वरुप अडणारी ही शक्ती इथल्या कणाकणात आहे. ती ज्या स्वरूपात आहे तो चैतन्यकण शोधता आला पाहिजे, पूजता आला पाहिजे.. तो पूजता आला ना की मग नवससायास ही गोष्ट अलगद बाजूला पडते. ती गोष्ट तिथेच का आहे, आणि ती तिथपर्यंत मला का ओढतेय हा प्रश्न मनाला पडला की मग बरोबर देव नावाची गोष्ट उलगडत जाते. मुळात देव उलगडणे हे पार्टीकल ऑफ गॉडला जमलं नाही ते आपल्याला काय जमणार म्हणा ?

म्हणून प्रश्न पडले, त्या प्रश्नांतुन एक अश्वत्थामा तुमच्यात जगला पाहिजे, तुमच्यासोबत फिरला पाहिजे. हा अश्वत्थामा एकदा का तुमच्यासोबत फिरायला लागला की मग तुमचा प्रवास व्यास वाल्मिकी वाटेवर सुरु होतो..

वारुळ, तांदळा, मूर्ती या सगळ्यात देवपण शोधताना कधीकधी त्या शक्तीच्या नावाच्या प्रवासात स्वतःला झोकून द्यायला हवं.. खूपवेळा तुम्ही प्रश्नाच्या मागे लागलात की उत्तर वाटेत येतात.. आई जोगेश्वरीचे नाव उच्चारताना हा प्रश्न पडतो.. आई कुणकोबाच्या साथीने किती वर्षांपूर्वी प्रकटली असेल.. किती वादळाना, किती लाटांना या जगतजननी किती उडवून लावत असेल.. आणि सगळ्यात म्हणजे दक्षिण काशीतल्या या भूमीत आईच्या अवतरणाची गोष्ट किती मोठी असेल ना ?

फार वर्षांपूर्वी विठलाई बद्दल लिहीताना ही इथे कशी आली हा प्रश्न पडला, आणि मग गावागावातील विठलाई देवी दिसू लागल्या. तसेच जोगेश्वरी नावाबद्दलचे अप्रूप वाढलेय. उत्तर मिळेल म्हणा.. पण तोपर्यंत प्रश्न हा आहे की आपण कितीवेळा गेलोय आपल्या कुलदेवतेला ? आजोळच्या देवीला ? हे प्रश्न पडायला हवेत. पिढ्यादरपिढ्या पुढे सरकताना ही कोरी पान आपल्याकडून राहता नये याची काळजी घेणे आवश्यक आहे.. नाहीतर 'गोत्र कश्यप' असं म्हणत इदम आत्मम मम म्हणायची वेळ येईल..

कोकणच्या मंदिर संस्कृतीत मुख्य मंदिरासोबत असणाऱ्या इतर मंदिराचे स्थानही मोठेच असते. ते आठवणीने पहायला, जाणून घ्यायला.. आई जोगेश्वरी कुणकेश्वर मंदिर प्रांगणात आहे. तिर्थक्षेत्रावरचे हे शक्तीपीठ आहे. साक्षात शिवासोबत शक्ती पूजणे हा अनुभव नारळओटी पल्याड आहे. खरंतर कुणकेश्वर अथांग आहे, मी समुद्र नाही पूर्ण कुणकेश्वर बद्दल बोलतोय.. डोंगरावरचा श्री कुणकेश्वर, समुद्रातली ती असंख्य शिवलिंगे , मंदिरावरचे ते गंडभेरुड आणि हा सगळा आसमंत ऊर्जामय करणारी आई जोगेश्वरी..

शिवासोबत असणारी ही शक्तीपीठ एका ऊर्जेने भारलेली असतात.. आपण फक्त वाचत नाही म्हणून समजत नाही.. चिपळूणला परशुराम पाहताना त्याच मंदिराच्या मागे असलेली आई रेणुका तिथेच असते.. आपण तिथपर्यंत जायला हवं..

अनादी निर्गुणपण आहे ना, ते डोळ्यासमोर असतो..देव्हाऱ्याच्या नारळात, वेशीवरच्या एखाद्या झाडाखालच्या घंटेखालच्या पाषाणात. तिथल्या सळसळणाऱ्या पांनाना, दिव्याच्या भोवती ओंजळ धरणाऱ्या वाऱ्याना ठाऊक असते की आई इथे आहे..

पुढल्या वेळी कुणकेश्वरला गेलात की भेटा एकदा आई जोगेश्वरीला.. अगदी शांतपणे.. कदाचित यावेळेस तिला तुमच्याशी बोलायचे असेल !

- ऋषी श्रीकांत देसाई

Comments