'भेटीचिये अंब, जिवीचिये जगदंब'


दोन वर्षांचा एक मोठा थांबलेला दर्शनप्रहर सूर्योदयाच्या पूर्वी मध्यरात्री पहाट म्हणून उजाडणार आणि आंगणेवाडीच्या भरडावर असलेल्या त्या मंदिर गाभाऱ्यातुन जगन्माता पुन्हा लेकरांच्या दर्शनाला सज्ज होणार. काळोख्या रात्री प्रकाशमान झालेली ती गोष्ट त्या कोस दोन कोसाची नसते. देहान तिथे असलेल्या आणि दूर असूनही मनाने तिथे पोहोचलेल्या लेकरांच्या आईच्या भेटीचा तो पूर्णत्व सोहळा असतो.. जत्रा, यात्रा, वार्षिकोत्सव यापैकी कुठल्याही शब्दात या सोहळ्याला तुम्ही लिहा किंवा उच्चारा, पण मिटल्या डोळ्यांनी या सगळ्याला एकच पंचाक्षरी उच्चार आहे आणि त्या ऊर्जामंत्राचे नाव आहे 'आंगणेवाडी' !


मागच्या दोन वर्षात कोरोनामुळे सतत धावत्या आयुष्याला एक खंडित काळाची विश्रांती मिळाली आणि अदृश्य असणाऱ्या काळनारदाने प्रश्न विचारला की तू हे सगळं कोणासाठी करतोय, का धावतोय. मनाला निष्ठुर बनवणाऱ्या त्या प्रत्येक वाल्याने न मिळणाऱ्या उत्तरासोबत स्वतःला शोधायला सुरुवात केली आणि मनाच्या गाभाऱ्यातला लपून बसलेला देव त्याला उलगडू लागलाय. आज या संपूर्ण यात्रेत तीच माणसे स्वतःच्या हसऱ्या चेहऱ्याने गाभाऱ्यात बिलगतील.


यंदा पुन्हा आंगणेवाडीची जत्रा भरतेय. मर्यादा फक्त भौतिक असतात आणि अथांगता ही माणूसपणाच्या श्रद्धेत खोल खोल असते.. यंदा जत्रा स्मरताना मागच्या दोन वर्षीचे रितेपण आठवलं तरच यंदाच्या जत्रेच्या वाटेवर निघताना प्रत्येक क्षणी डोळे भरून येतील. किंबहुना माझ्यासह अनेकांना जत्रेसाठी केवळ रस्त्यावर रेंगाळण्यापेक्षा लोक तासन तास जत्रेत दर्शनरांगेत का उभी राहतात या प्रश्नाचे उत्तर देणारी ठरतील.

आंगणेवाडीच्या जत्रेचा लेख लिहिताना शब्द ना नेहमी त्या धामापूरच्या तळ्यातल्या परडीसारखे भरभरून येतात. फुल सोडावीत आणि फक्त सोने यावं. इतरांना कितीही वाटा , आपली ओंजळ नेहमी भरुन उरतेच. यंदाही ओंजळ तीच आहे फक्त आता देवीकडे मागायला मला कुठल्याही गाऱ्हाण्याची गरज नाही, डोळ्यांच्या ओंजळी झाल्या आहेत. ती आंगणेवाडीची देवी अखंड त्रैलोक्य सत्ताधीश आहे.. माय अंब आज रुजीव पाषाणातून उत्सवी रुपडे लेवून लेकरांशी बोलणार आहे.

आंगणेवाडीला तुम्ही जत्रा म्हणा की वार्षिकोत्सव म्हणा.. शब्दांनी भावनेला कसला फरक पडणार आहे म्हणा..ही जत्रा ना लोकांची नसतेच मुळी.. आंगणेवाडीची जत्रा ही माणसाची असते. आपल्या माणसांनी आपल्या माणसाला भेटायची ती एक तिथी असते. एकाच आईच्या लेकरांचा तो कौटुंबिक सोहळा असतो. 

ज्यांना ज्यांना आंगणेवाडी शब्द ठाऊक असतो त्या प्रत्येकाला या जत्रेला आज इथे प्रत्यक्ष यायचे असते. पंढरीच्या कळसाला पाहून जे सुख मिळते तेच सुख इथं कळस दर्शनाला पाहून मिळते. मंदिर, भक्ती, नियोजन, राजकीय नेते, पोलीस, प्रशासन , एसटी महामंडळ आणि बाजाररहाट यांचा हा सरळरेखीय आलेख असतो. आणि त्याच आलेखावर लाखो बिंदू 'भक्त' म्हणून स्वतःला ओवतात ना त्या उत्कर्षरेखेला खऱ्या अर्थाने जत्रा म्हणतात.

कोरोनानंतर बदललेल्या जगाची सवय करताना जत्रेत जाऊन  काहीतरी शोधणाऱ्याच्या गवशेपणाच्या यादीत आता आपण सगळे सरकतोय. आपण आपल्याला आता शोधत चाललोय, एकलकोंडे पणातून आता समूह आपल्या जगण्यात का हवा या वाटेवरची ही जत्रा आहे. गाभाऱ्यात असलेल्या शक्तीपुढे नतमस्तक होताना ती ऊर्जा आतून भरून येणे या वाटेवरची ही यंदा भक्तीगाथा आहे.

पुन्हा लेकरांनी आपल्या आईला भेटण्याचा आणि माणसांनी पुन्हा माणसाच्या गर्दीत हरवून स्वतःला श्रीमंत करण्याचा हा योग पुन्हा जुळून आलाय. या योगाचे फक्त आणि फक्त सोनेच होऊ शकते. हाच दर्शन सोहळा अंबरूपाची देऊन जगदंबपणाची प्रतीती नक्की देईल.. आपण फक्त चालायला हवं, अंब शोधायला आणि मिळणारे सुख ललाटी मिरवायला हवं, जगदंब म्हणून !!


ऋषी श्रीकांत देसाई


Comments