भस्मगुलाल


वाराणसीच्या मनकर्णिका घाटावर जी स्मशान होळी खेळतात त्यात राखेचा गुलाल होतो. रंगभरी एकादशीला शिवशक्तीचा संगम झाला त्याची आठवण म्हणून या राखेचा रंग देहावर भिनतो. शिव अर्थात शव, शिव अर्थात मृत्यु, शिव अर्थात मोक्ष, शिव अर्थात जीवनाचे अंतिम सत्य, शिवनगरी काशीतले हा चिताभस्म गुलाल आयुष्याचे अंतिम सत्य आहे.


भारताच्या संस्कृतीरंगातला हा जो भस्मरंग आहे तो देहभान विसरण्याचा गुलाल आहे. आपल्यापासून तसे हे कोसो दूर आहे. आपली प्रथा ही मस्त आहे. काही ठिकाणी होळी प्रज्वलित करतात तर काही ठिकाणी हुडा उभारतात. सगळाच अनोखा रंग आहे. जळलेल्या होळीसमोर नारळ भिरकावायची ती प्रथा 'तानाजी'त पाहताना ग्लोबल बनली हे जाणवलं.


दहन होत असलेल्या होळीवरुन आठवलं,आपणही होळीला ती चिमूटभर राख घरी आणतोच ना.. "वंदितासि सुरेन्द्रेण ब्रम्हणा शंकरेण च ।अतस्त्वं पाहि माँ देवी! भूति भूतिप्रदा भव ॥" हा जाप करायचा आणि ती चिमूटभर राख माथ्यावर भस्म लावायची असे शास्त्र सांगते. ती राख घरात जपायची पुजायची. ती राख घरातले अमंगल दूर करते असा एक विश्वास असतो. 


मुद्दा मनकर्णिका घाटाचा नाहीय, मुद्दा एवढाच आहे की, यंदा पाच लाख लोक हातात राख घेऊन गुलाल उधळत आहे. ते सगळेच साधू नाहीयत, पण हा उधळणीचा मार्ग रंग म्हणून त्यांनाही भिनलाय. जे आहे ते स्वीकारूया, मरणासहित जगणं अटळ बनवूया !


"आणि एकदा सगळं जगणं हे अटळ मानलं की मग, राखेचीही तमा नाही उरत हेच खरे" !

Comments