#सोरट


#PepsiWheresMyJet 

नेटफ्लिक्सवरची चार भागाची ही डॉक्युमेंटरी सिरीज , 'पेप्सी व्हेअरस माय जेट'.. बहुराष्ट्रीय कंपन्या आणि त्यांच्या फसव्या ऍड प्रमोशनची ही गोष्ट आहे. पेप्सी आणि कोलाचे आरूढ असलेल्या नव्वद आणि त्यानंतरच्या पिढीला ह्या गोष्टी लवकर समजतील. 


पेप्सीच्या बुचावरचा कोड किंवा स्टिकरच्या मागील कुपन ह्या गोष्टी आपण पाहिल्या आहेत. टोपी, बॉल, टी शर्ट, शारजाचे तिकीट, विमान ट्रिप ह्या सगळ्या गोष्टी साध्या साध्या किराणा दुकानावर ह्या जाहिराती पाहिल्या आहेत.   त्याच्या प्रलोभनाला जिवंत ठेवणारा शक्तिमान, ओम नम शिवाय , युग सारख्या सिरीयल चा पण काळ जगलाय. 

त्याचवेळाला गावच्या दुकानावर एक मोठा कार्डबॉर्डचा पेपर लागायचा. त्यावर पण अशीच बक्षिसे लागायची, फक्त त्यावर मोठं बक्षीस असायचे सायकल किंवा बॅट ! साधारणपणे पन्नास पैशाचे एक कसले तरी चॉकलेट , आणि त्याच चॉकलेटच्या कागदात लपवलेले कुपन, आणि अशी शेकडो कुपन जमवल्यावर मिळालेलं एक बक्षीस..  त्याला फक्त गावची सोरट, म्हणून हसल्यावारी नेलेली गोष्ट पेप्सीच्या एका मोठ्या फ्रॉडमुळे क्लिअरकट पिक्चराइज्ड झालीय..


पेप्सी चांगली की कोक खराब हा मुद्दा नाहीय, तो प्यावा की न प्यावा यावर ते अवलंबून आहे..पण त्या दरम्यान ज्या स्टारडमने जे पोहोचवलं त्यांनाही छोट्या छोट्या गावात कुणीतरी कुपन जमवत मी सचिन बरोबर श्रीलंका मॅच पाहणार, किंवा शाहरुख छय्या छय्या जाकीट मिळणार अशी स्वप्नं पाहणारी चिमुरडी माहीतच नसतील.  दोष सचिन शाहरुखचा नसेल किंवा दोन चॉकलेट किंवा पेप्सीच्या बुचामागे धावणाऱ्या पोरांचाही नसेल.. पण या दोघांनाही वेडं करणाऱ्या त्या प्रमोशन स्किलचा नक्की असेल..


पेप्सी व्हेअरस माय जेट'..च्या चार भागात सांगितलेली गोष्ट एका भागात संपली असती पण मग ती फक्त जिंकल्या हरल्याची गोष्ट झाली असती. लढणे म्हणजे काय, जिंकणे म्हणजे काय आणि हरणे म्हणजे काय ते समजलं नसते.. एकीकडे रिलायन्स 'कॅम्पा कोला' मार्केटमध्ये आणत असताना पेप्सीची ही डॉक्युमेंटरी कदाचित मोठा नंबर गेम ठरेल. एवढी वर्ष दर्जा राखलेल्या कोला आणि पेप्सीसाठी आता स्पर्धा ब्रँडनेमसाठी मोठी झालीय.. म्हणून ही डॉक्युमेंटरी पाहणे गरजेचे आहे. बाकी चौथ्या भागात जो छोटासा कोर्ट सिन दाखवलाय तो का कोण जाणे महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीचे भाकीत सांगतोय असे उगाच वाटत राहते..


बाकी 20 रुपयात हेलिकॉप्टर मिळते का या प्रश्नाचे उत्तर काही वेळा हो असेही असते !

Comments