या जगण्यावर 'षष्ठब्दा' प्रेम करावे


मालवणच्या लोकोत्तर आळीत काही माणसे अशी आयुष्य जगतात की त्यांच्या तरुणपणाचे कौतुक हे ते साठी सत्तरी ओलांडली तरी कायम राहते. मागच्या साठ वर्षांपासून मालवण जगणारा 'नितीन वाळके' हा सद्गृहस्थ त्याच पठडीतला. पु.लच्या व्यक्ती आणि वल्ली वाचून झाल्यावर काही माणसे आपल्या नजरेला आठवत राहतात त्यातला एक भला माणूस म्हणजे नितीन. माझ्या आई वडिलांसोबत कॉलेज मध्ये असणारे नितीन वाळके म्हणजे साठोत्तर न वाटता अरे तुरे का वाटतात या प्रश्नाच्या उत्तरात लपलेला नितीन हा त्याच्या स्वभावधर्मा एवढा मिश्किल आहे.


नितीन वाळके यांच्या व्यक्तिमत्वाला मिळालेले जे वेगवेगळे पैलू आहेत ते अष्टपैलू माणूस या शब्दातच लिहिता येतील. रंगभूमीवरचा एक जबरदस्त दिग्दर्शक, कॉलेजच्या  जीवनात विद्यार्थी चळवळीची ताकद समजलेला खरा युवा नेता,  पुढच्या पिढीचा व्यापार ओळखणारा आणि आपली बाजारपेठ निर्माण करणारा उद्यमी माणूस आणि या संगळ्यापेक्षाही पालक म्हणून किती सुजाण असले पाहिजे हे मुलांच्या शिक्षणापासून ते त्यांच्या तरुणपणात आपल्या दायित्वाचे प्रमाण किती असावे हे सप्रमाण सिद्ध करणारा नितीन अशा अनेक आयामात नितीनला पाहताना, केवळ नितीन हा लोलक म्हणून आजही तसाच आहे, त्याच्या किरणांचे सप्तरंग मात्र आजही तजेलदार आहेत हे समजून घ्यावे लागेल.

नितीनकडून शिकताना त्यांचा समाजवाद, त्यानंतरचा कृतीतील गांधीवाद, आणि आता राजकीय विरोधाच्या विचारांच्या वाटेवर निघताना मूळ नितीन बदलू नये यासाठी घेतलेली राजकीय तटस्थ भूमिका ही त्या मूळ समाजवादी कार्यकर्ते असणाऱ्या वाळके परिवारातील नितीनला कायम वेगळी बनवते. काल परवा राजकारणात आलेल्या राजकारणाचा मोह आणि आजच्या पत्रकारितेत राजकीय आकलन आणि संदर्भाच्या उणिवात नेहमीच नितीनचे समाजात कायम कार्यरत असणे गरजेचे आहे. आज सगळं वेल सेटल आहे पण कधी काळी नितीनवर शारीरिक हल्ला चढवणे ही राजकीय गरज बनली होती, हे आज सांगूनही पटणार नाही आणि खरंही वाटणार नाही. कॉलेज जीवनात जागृती पॅनल स्थापन करणाऱ्या नितीन वाळकेना राष्ट्रवादीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठली स्पेस भरायचीय  ते बरोबर समजलं. आणि मग हॉटेल चैतन्यची टेबल खुर्च्या शह काटशहच्या राजकारणाची प्यादी बनायची. आज बदललेल्या राजकारणात अनेक मोठ्या नावांना कदाचित नितीन वाळके या नावाची गरज नसेल पण त्यांच्या पहिल्या विजयाच्या हारात त्यांच्यावर उधळलेल्या पहिल्या गुलालात नितीनचा वाटा मोठा होता हे मालवणला माहीत आहे. अर्थात आज दाढी वाढवलेल्या नितीन त्या संदर्भाची गरज नाहीय. त्याच्यासोबतचे कणकवली कुडाळवाले आमदारकीची स्वप्न पाहताना नितीन त्या वाटेवरही जात नाही हे जसे खूप महत्वाचे आहे तसेच राजकारणात मोठ्या पदावर अगदी जवळचा माणूस असतानाही त्या वाटेवर न जाता तटस्थ राहणे हे फक्त आणि फक्त नितीनलाच जमू शकते! 


स्वतः एक चैतन्य असणारा नितीन हॉटेल व्यवसायात उतरला तोही चैतन्य नावानेच! खरंतर हा चैतन्य हा नितीन ब्रँड असला तरी सुरेखा हा त्यातला मोठा फॅक्टर आहे, आणि या दोघांना छेदणारा नवचैतन्य हा मित्र वाळकेने बनवलेला मोठा ब्रँड आहे. मालवणच्या हॉटेलची मुंबईत विस्तारत जाणारी शाखा ही जशी मुंबईची गरज आहे त्याहीपेक्षा नितीनची मोठी झेप आहे. नितीन  हा तुम्ही ज्या क्षेत्रात नवीन काही करायला जाल तिथे अगोदरच क्षितिजावर बसलेला दिसेल. अखंड धडपड, अखंड वाचन, आणि अखंड आपल्याला शोधण्याचा प्रवास नितीन वाळके यांना एक ब्रँड बनवत गेलाय

नितीन आज साठीचा झालाय, अशी जन्मकागदपत्रे म्हणतायत म्हणून आपण त्याला साठीचा दाढी वाढवलेला माणूस म्हणू फारतर, पण अजूनही मालवणच्या 90 टक्के जनतेला तो 'रे नितीन'च आहे. हे तरुणपण असे सहजासहजी नाही मिळत.. बोलीभाषा जपावी लागते, मुलांना आदर्शवत घडवावे लागते, पत्नीला उद्योजिका म्हणून आभाळ मोकळे करून घ्यावे लागते, हॉटेलचा विस्तार होताना त्यात स्वतःचा ठामपणा जपावा लागतो,  माणूसमेळा गोळा करुन अखंड आनंदयात्री बनावे लागते. वाचत राहावे लागते, कलेवर प्रेम करावे लागते..आणि हे सगळं करताना खूप दूर दूर रहावे लागते.. आणि या अशा जगण्याची गोष्ट असते ना त्याचेच नाव असते 'नितीन वाळके' !

Comments