येवा कातळ आपलाच आसा !

जमेल तेवढ्या लोकांशी बोललो.. प्रकल्प समर्थक किंवा विरोधक असा फरक डोक्यात ठेवून काहीच बोलायचं नव्हते.  बोलणारा माणूस आणि त्याच्या नजरेतला त्याला हवा असलेला हक्क बोलता करायचा होता..

ज्याची ज्याची जमीन गेलीय , त्या प्रत्येकाला एक भूमिका हवीय.. मारणाऱ्या पोलिसांबद्दल त्याची कुठलीच तक्रार नाहीय, सरकारबद्दल राजकीय द्वेषही नाहीय.. पावलापावलावर बेशरमपणे खोटे बोलणाऱ्या नेत्याबद्दल मात्र कमालीचा राग भरलाय..

त्या गावकऱ्यांना सगळं काही समजून सांगावे असे कुणालाच वाटलं नाही, तो विरोध करतोय तसेच तो वैज्ञानिक स्पष्टीकरण मागतोय.. मुंबईहुन कोण कोण आले याचे उत्तर समर्थन आणि विरोधक दोन्ही गटात समसमान आहे. 

बारसु हे जरी एक आंदोलन गाव असले ना तरी बारसुच्या निमित्ताने सोलगाव, धोपावे, देवाचे गोठणे पुढे मग नाटे, जैतापूर आणि मग आंबोळगड पर्यंत सरकणारी ही मोठी गोष्ट आहे.. समर्थन आणि विरोध सुरूच राहील.. सामान्य माणसाचा हक्कासाठी आणि नेत्यांचा सत्ताप्राप्तीसाठी !

ड्रीलिंग थांबवले असते तरी सगळं शांत झाले असते, कलेक्टर ऑफिसमध्ये सगळी उत्तर मिळाली असती तरी सगळं शांत झाले असते. त्याही थोडं माग जाऊन गावकऱ्यांना समजावून सांगितले असते तरीही काहीच झालं नसते कदाचित..

पण कदाचित म्हणून काटे मागे सरकवून दरवेळेला सरकारी खोटारडेपणा ठसठशीत दिसतोय.. हा एक, मग तो एक, मग आणखी एक असे सगळं आता कुजबुज आता पसरू लागली..

प्रकल्प चांगला की वाईट हा भाग खूप वेगळा आहे, मुळात तो ज्या पद्धतीने दडविला जातोय ते वाईट आहे. तीन दिवस आंदोलन स्थगित केल्यावर तुम्ही ड्रीलिंग स्थगित करता म्हणता आणि अर्धा दिवस उलटल्यानंतर पुन्हा ड्रीलिंग करता ? कशासाठी हा खोटारडेपणा ? तीन दिवसांत नाही सुरु झालं असते का ड्रीलिंग ?

रात्रीत झाडे कापणे आणि दुपारी परत ड्रीलिंग सुरु करणे याला कसलीही मर्दुमकी म्हणत नाही, पळपुटेपणा म्हणतात.. तुमचा हेतू कोकण विकासाचा आहे ना, तुम्हाला मूळ कंपनी 5 प्रकल्पात मिळून 66 हजार नोकऱ्या देते तिथे एक लाख नोकऱ्या द्यायच्या आहेत ना मग नका लपवाछपवी करू ?



या सगळ्याचा शेवट एन्रॉन होईल, स्टरलाईट होईल ठाऊक नाही पण जैतापूर होऊ नये हीच इच्छा ! जैतापूरच्या वाटेवर नाटे चौकात तबरेज सायेकरच्या फोटोकडे पाहण्याची हिम्मत पण होणार नाही.. कारण माहीत नसेल तर सांगतो आजघडीला जैतापूर प्रकल्प आज बंद पडलाय, भले मोठे टाळे लावून..

बाकी विरोध आणि समर्थन सुरूच राहील.. कारण 2010 साली दडी मारुन बसलेले 25 प्रकल्प वाट पाहतायत, तुमच्या घराबाजूच्या कातळाची !


Comments