सगळेच सत्तेत !

राज्यात सत्तेला नवे शिलेदार मिळाले, पण आता खरंच विरोधक कोण हा प्रश्न महत्त्वाचा आहे. सरळ मुद्द्याचे बोलायचे म्हटले तर, भाजप सत्तेत असलं तरी राष्ट्रवादी आणि शिवसेनामुळे ठाकरे आणि पवारांची कामे अडतील असे वाटत नाही. कारण उद्या शरद पवारांना काही कामं असली की ते कदाचित मुख्यंमंत्र्याकडे जातील. आणि ठाकरेंना काही कामे असली की ते अजितदादांकडे जातील.. काम दोघांचीही होतील. शिललक राहिलेल्या आमदारातही २०२४ पर्यंत चालून जाईल. यानंतर आता उरली काँग्रेस.. त्याना मंत्रालयात काम झाली काय आणि नाही झाली काय ते निवडून येणारच याची खात्री आहे. कारण काँग्रेसच्या आमदारांना काँग्रेस सोडणे हा सगळ्यात डेंजर गेम वाटतो. कारण अजुनही सगळ्यांच्या सर्व्हेमध्ये महाराष्ट्रातील काँग्रेसचा व्होटर कुठच सरकत नसल्याचे स्पष्ट झालय. जवळ जवळ पन्नास मतदारसंघात हे चित्र क्लिअर आणि कन्फर्म आहे. त्यामुळे सत्तेत कोणीही असलं तरी त्याचा गुलाल पक्का आहे असे त्यांना वाटते. 

मागच्या वर्षी ठाकरेंची शिवसेना फुटली आणि यंदा पवारांची राष्ट्रवादी फुटली या दोन गोष्ट अत्यंत बारकाईने पाहायला पाहिजे. खरतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार सत्तेत असताना उद्धव ठाकरे आणि शरद पवार अडचणीत येतील ह्या समजात जर कोणी असेल तर तो मला तरी वैयक्तिक गैरसमज वाटतोय.. उलट आता सगळेच स्पष्ट झालयं. हा एक मात्र नक्की की, अजितदादांना शरद पवारांना दिलेला दणका हा एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंनी दिलेल्या दणक्यापेक्षाही मोठा आहे. शरद पवारांना आता पुन्हा संघटना बांधणीसाठी स्वतला पायपीट करावी लागणार आहे. शिंदेच्या बंडानंतर शिवसैनिक ठाकरेंसोबत राहिल्याने, तो स्वत मातोश्रीवर येत असल्याने संघटना तशीच राहिली. अजित दादांकडे पुर्ण संघटना आणि नेते आले आहेत. कार्यकर्तेही आलेत.. शरद पवारांना शिल्लक आमदार खासदारांपेक्षा आता नवे पदाधिकारी घडवावे लागतील. उद्धव ठाकरे नारायण राणे, राज ठाकरेंच्या बंडानंतर संघटनेकडेच लक्ष देत असल्याने त्याना प्रत्येक फुटीवेळी दुसरी फळी त्यांना जिंवत करावी लागते. पवारांना आता सेंकड फळी शोधावी लागणार आहे. बारामतीत तर शरद पवारांचे कार्यकर्ते कोण हा प्रश्न आहे. 

बाकी ते दोन भाऊ एकत्र येणे, उद्धव ठाकरे एकटे लढणे ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत असे मला वाटते. इकडे तीन आणि तिकडे तीन अशीच लढाई सुरु झालीय. राष्ट्रवादीतल्या अजित पवार गटाचा २०२४ ला लोकसभा निवडणूक निकालातला फायदा भाजपला स्पष्ट आहे. पण आजच्या घडीला शिंदेनाही धोका वाटत नाहीय कारण मुंबई महापालिकेला अजित पवार काहीच करु शकत नाही, भाजपच्या जोडीला शिंदे गरजेचेच आहे. 

ह्या सगळ्या गोंधळाचा अन्य प्रादेशिक राजकिय पक्ष किंवा बीआरएसला फायदा होण्याच्या शक्यता आजघडीला धुसर झाल्या आहेत.. भाजपच निवडून येणार का या प्रश्नाची उत्तरं अनेक असतील, पण निवडून आलेला भाजपचाच असेल हे वाक्य खुप महत्त्वाचं आहे.. या सगळ्याचा विचार करताना २०२४ ला निवडणूक लढताना पक्ष आणि चिन्ह यापेक्षाही उमेदवारीचा चेहरा हेच चिन्ह  आणि तोच पक्ष महत्त्वाचा ठरेल हे चित्र याघडीला मला दिसतेय. आणि त्यासाठी पक्षाच्या मर्यादा ओलांडून विरोधी पक्ष त्यांचे कार्यकर्ते यांच्याशी असलेला वैयक्तिक प्रभाव हेच त्या उमेदवाराचे मताधिक्क्य ठरणार आहे. 

बाकी आता सगळं काही तुम्ही ज्या पक्षात आहात, त्याच्या मनासारखं होईल, असे अजिबात घडणार नाही.. कारण आज आकडा मोठा असणारेही सत्तेत असूनही नसल्यासारखे आहेत.. आणि काहीच नसूनही अनेक जण सत्तेत आहेत हेच वास्तव आहे.

Comments